Maharashtra Political Crisis: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. पन्नास आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर भाजपसोबत हातमिळवणी करुन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडाविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर आता 20 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
शिवसेनेतील बंडखोरीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर आहे. याबाबत आज मोठी माहिती समोर आली आहे. 11 जुलै रोजी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी करता येणार नसल्याचेही स्पष्ट केले होते. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टातली सुनावणी 20 जुलै रोजी घटनापीठासमोर होणार आहे. विशेष म्हणजे ही सुनावणी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरन्यायाधीश एनव्ही रमण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायाधीश कृष्णा मुरारी आणि न्यायाधीश हिमा कोहली उपस्थित असतील. सध्या सुप्रीम कोर्टात 16 आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नोटिशीला शिंदे गटाचे आव्हान, एकनाथ शिंदेंना सरकार स्थापनेचे निमंत्रण देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला शिवसेनेचे आव्हान, विधानसभा अध्यक्ष निवडीची अनुमती देण्याच्या निर्णयाविरोधात कोर्टात याचिका , एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेतेपदी कायम ठेवून चौधरींची नियुक्ती रद्द करण्याला आव्हान, या सर्व याचिकांवर सुनावणी होणार आहे.