उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागणे ही आमच्यासाठी दु:खाची गोष्ट आहे. आम्ही त्यांना लवकर निर्णय घेण्यासाठी सांगत होतो. परंतू, त्यांनी वेळ लावला, यासाठी काही मोठे नेते जबाबदार आहेत. संजय राऊतांमुळे हे सारे घडले आहे, असा घणाघाती आरोप एकनाथ शिंदे गटाने केला आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी, ठाकरेंकडे असलेल्या १४ आमदारांना मोठा इशारा दिला आहे. शिवसेनेतील १४ आमदार आणि आणि वेगळे नाही, आमचा गट एकच असेल. आता पुढचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. कदाचित ते नसतील. आमचा व्हीप नाही पाळला तर त्यांना डिसक्वालिफाय करायचा की नाही हे शिंदे साहेब ठरवतील, असा इशाराही केसरकर यांनी दिला.
संजय राऊत मधेच असतील तर ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येण्याची शक्यता नाहीय. नाहीतर आम्ही ठाकरेंना आमच्यासोबत बोलवू, तेच आमचे नेते आहेत. आम्हाला जर कोणी डुक्कर, कुत्रा म्हणत असेल किंवा आमच्या आई, बहीणींना शिव्या देत असेल तर कसे आम्ही त्यांच्यासोबत राहू, असा सवालही केसरकर यांनी उपस्थित केला.
आम्ही उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाण्याआधीच भेटलो होतो, सारे काही सांगितले होते. परंतू, आम्हाला काही नेत्यांनी लांब केले. ठाकरेंच्या एनसीपीचे नेते जवळचे झाले, आणि आम्ही लांब होत गेलो. त्याला उद्धव ठाकरे जबाबदार नाहीत. पण आता अंतर वाढले आहे, असेही केसरकर म्हणाले.