मुंबई : शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा आजचा नववा दिवस आहे. मात्र, हा सत्तासंघर्षाचा येत्या चार दिवसात संपण्याची चिन्हे आहेत. राज्यातील नवीन सरकारचा शपथविधी येत्या ३ जुलै रोजी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शिवसेनेतील बंडखोर आमदारांचा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्या मुंबईत पोहोचणार असल्याची माहिती स्वत: एकनाथ शिंदे यांनी दिली. उद्या सर्व आमदारांना घेऊन मुंबईत येणार आणि बहुमत चाचणीसाठी हजर राहणार अशी माहिती त्यांनी दिली. एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी कामाख्या देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी उद्या मुंबईत येण्याबाबत वक्तव्य केले.
भाजप आणि एकनाथ शिंदे गटाची सत्ता लवकरच राज्यात येण्याची चिन्हे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ३ जुलै हा ठरला आहे. मात्र, ३ जुलैला हैदराबादला भाजपची राष्ट्रीय कार्यकारणी आहे. त्यामुळे ३ जुलैला शपथविधी ठेवायचा की नाही अशी देखील चर्चा सुरू आहे. कदाचित या दिवशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघे शपथ घेतील आणि नवीन सरकार स्थापन केले जाईल. त्यानंतर भाजपची राष्ट्रीय कार्यकारणी झाल्यानंतर नंतर इतर मंत्र्यांचा शपथविधी होईल, अशीही शक्यता वर्तविली जात आहे.
दुसरीकडे, उद्या बहुमत सिद्ध करण्याच्या आधीच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा असा दबाव त्यांच्यावर शिवसेनेतून आणला जात आहे. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण बहुमत चाचणी घेऊ असे सांगितले आहे. जर उद्या अधिवेशन झाले तर भाजप आणि बंडखोर गटाकडून सरकारवर आणि उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली जाईल. अधिवेशन लाईव्ह टेलिकास्ट केले जाणार आहे. त्यामुळे शिवसेनेची बदनामी होईल असेही सांगितले जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आज राजीनामा देणार का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, जर त्यांनी राजीनामा दिला तर सरकार कसे व कधी बनवायचे हा प्रश्न सुरू होईल.
याशिवाय, आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही. सगळ्या आमदारांचे बहुमत आमच्या बाजूने आहे. त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना, अशी भूमिका बंडखोर आमदारांचा गट घेणार आहे. त्यामुळे सरकार भाजप-शिवसेनेचे स्थापन होईल, आणि खरी शिवसेना कोणाची हा वाद निवडणूक आयोगाकडे पुढे काही वर्ष चालू राहील, अशी स्ट्रॅटेजी असल्याचे सांगण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडत जवळपास ४० हून अधिक आमदारांचा एक मोठा गट आपल्या सोबत उभा केला आहे. हे सर्व आमदार गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. त्यामुळे राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, येत्या दोन-तीन दिवसानंतर गुवाहाटी येथील बंडखोर आमदारांना गोव्यात आणण्यात येणार आहे. तेथे एका हॉटेलमध्ये ४२ खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोकणातील एका नेत्याने पुढाकार घेतल्याची चर्चा आहे.
उद्याच मुंबईत जाणार - एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी कामाख्या देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला सुख समाधान आणि समृद्धीचे दिवस येवोत यासाठी आम्ही कामाख्या देवीकडे मागणे मागितले आहे. कामाख्या देवीचे दर्शन हे श्रद्धेचा विषय आहे. आपलं मागणं घेऊन सर्वच जण कामाख्या देवीकडे येतात आणि देवी त्यांना आशीर्वाद देतात. आता आम्ही उद्या सर्व आमदारांना घेऊन फ्लोअर टेस्ट साठी जाणार आहोत आणि जी कोणतीही प्रक्रिया पार पाडायची असेल त्या पद्धतीची पूर्तता पार पाडण्यासाठी आम्ही उद्याच मुंबईत जाणार आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.