मुंबई - मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकारणात भूकंप आला आहे. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल ३९ आमदार पक्षनेतृत्वाच्या विरोधात जात गुवाहाटीला पोहचले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नकोच अशी भूमिका या आमदारांनी घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला एकूण ५१ आमदार असल्याने राज्यातील महाविकास आघाडीसरकार अल्पमतात आल्याचं चित्र आहे.
त्यात आता भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दावा करत पुढील २-३ दिवसांत राज्यात भाजपाचं सरकार येईल. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीची महापूजा त्यांच्या हस्ते होईल. त्याचसोबत फक्त आमदारच नाही तर शिवसेनेचे १०-१२ खासदारही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचा दावा त्यांनी केला. सुप्रीम कोर्टाने बंडखोर आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईला १२ जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे आमदारांवर कुठलीही कारवाई होणार नाही.
सुप्रीम कोर्टच्या निर्णयानंतर भाजपाच्या हालचालीही वाढल्या आहेत. सोमवारी कोअर कमिटीची बैठक झाली. यात सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. अद्यापही भाजपा नेते या स्थितीवर थेट भाष्य करणं टाळत आहेत. मात्र भाजपा आमदारांना २९ जूनला मुंबईत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आमदारांच्या बैठकीला विधानसभा अधिवेशनासाठी तयार राहण्याचं सांगण्यात येणार आहे. बैठकीत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करणार आहेत. तर गुवाहाटीत शिंदे गटाच्या आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा होणार आहे. हे आमदार महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढत असल्याचं पत्र राज्यपालांना पाठवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुढील ४८ तास राज्यात राजकीय हालचालींना वेग येणार आहे.
शिंदे गटातील काही आमदार संपर्कात - राऊतकोर्टाच्या निर्णयानंतर बंडखोर आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. यातील सर्वांनाच मी बंडखोर म्हणणार नाही. त्यातील काहीजण आमच्या संपर्कात आहेत. गुवाहाटीत बसून उद्धव ठाकरे यांना सल्ले देऊ नका. मुंबईत या चर्चा करा असं आवाहनही राऊतांनी केले आहे. त्याचसोबत राज्यात निर्माण झालेल्या राजकीय डबक्यात देवेंद्र फडणवीस यांनी उतरू नये असंही संजय राऊत म्हणाले आहेत.