Maharashtra political crisis: आज महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा दिवस आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी ट्विटरवरुन राष्ट्रवादी कांग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ता नाट्याचा आज शेवट झाला. बंडखोरांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर सरकार अल्पमतात आले होते. उद्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते, पण आजच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. यानंतर एकीकडे भाजपच्या गोटात जल्लोषाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
संजय राऊत काय म्हणाले?यानंतर आता संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ''मी शरद पवार यांचे आभार मानतो. त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मुलास सांभाळून घेतले, मार्गदर्शन केले. स्वतःचे लोक दगाबाजी करत असताना शरद पवार उद्धवजींच्या मागे ठामपणे उभे राहिले. काँग्रेस नेत्यांनीदेखील सदैव समन्वयाची भूमिका घेतली. सत्ता येते सत्ता जाते, अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही!'' असे राऊत म्हणाले.
दुसऱ्या ट्विटमध्ये राऊत म्हणतात की, ''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत विनम्रपणे राजीनामा दिला. एक संवेदनशील, सभ्य मुख्यमंत्री आपण गमावला आहे. इतिहास साक्षी आहे की, फसवणुकीचा अंत नीट होत नाही. ठाकरे जिंकले. शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे. लाठ्या खाऊ, तुरुंगात जाऊ, पण बाळासाहेबांची धगधगती शिवसेना जिवंत ठेवू,'' असे राऊत म्हणाले.
भाजपा उद्या सत्तास्थापनेचा दावा करणारउद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. यामुळे भाजपाच्या गोटाच आनंद साजरा केला जात आहे. ताज हॉटेलवर सर्व आमदार जमले असून उद्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करण्याची माहिती मिळत आहे. उद्याच विधानसभेचा हंगामी अध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे उद्या मुंबईत आपल्या समर्थक आमदारांसह येणार आहेत. यानंतर भाजपा सत्तास्थापनेच्या हालचाली करणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.