अडीज वर्षांपूर्वी सत्ता स्थापन करताना ज्या दोन अपक्ष आमदारांना तातडीने मुंबईत आणण्यासाठी शिवसेनेने चार्टर्ड प्लेन पाठविलेले होते, त्यापैकी एक आमदार सूरतला जाऊन पोहोचला आहे. हे आमदार शिवसेनेसोबत नाही तर एकनाथ शिंदेंच्या बाजुने आहेत.
भंडारा येथील शिवसेना समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर हे काही मिनिटांपूर्वी सूरतच्या हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. भाजपाच्या संजय कुटेंसारखीच त्यांचीही कार पोलिसांनी हॉटेलबाहेरच अडविली होती. यानंतर भोंडेकर यांनी आपण शिंदेंचे समर्थक असल्याचे सांगितले. पोलिसांना आतमध्ये फोनाफोनी करून चौकशी केली. शिंदेंकडून जेव्हा होकार आला तेव्हाच त्यांनी भोंडेकर यांना आतमध्ये सोडले.
नरेंद्र भोंडेकर हे शिवसेनेचेच आमदार होते. परंतू, जागांच्या वाटाघाटीवेळी २०१९ मध्ये भंडाऱ्याची जागा भाजपाकडे गेली यामुळे भोंडेकर यांनी बंडखोरी केली होती आणि जिंकले होते. निवडणुकीनंतरही त्यांनी अपक्ष म्हणूनच शिवसेनेला पाठिंबा दिला होता.
२०१९ मध्ये ज्या दोन आमदारांसाठी खास विमान पाठविण्यात आले होते त्यापैकीच एक भोंडेकर होते. दुसरे आशिष जयस्वाल होते. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीतही शिवसेनेसोबत होते. मात्र, आता शिंदेंनी बंड केल्याने ते त्यांच्यासोबत गेले आहेत.