Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात शिवसेना विरूद्ध बंडखोर आमदार एकनाथ शिंदे गट असा सत्तासंघर्ष गेले सात-आठ दिवस सुरू आहे. राज्यात शिवसेना भाजपाचे सरकार यावे यासाठी शिंदे गटाने बंडखोरी केली असल्याचे सांगितले जात आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील इतर पक्ष काहीच निर्णय घेत नसल्याचे पाहून अखेर मंगळवारी राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर काही अपक्ष आमदारांनी सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी आज मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून २४ तासांत बहुमत चाचणीला सामोरे जाण्यास सांगितले. पण राज्यपालांच्या या निर्णयानंतर शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी या चांगल्याच संतापल्याचे दिसून आले.
"सर्वोच्च न्यायालयाने 11 जुलैपर्यंत 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाबाबत स्थगिती दिली असताना फ्लोअर टेस्टची (बहुमत चाचणी) मागणी कशी करता येईल? या आमदारांच्या अपात्रतेच्या दर्जाबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही आणि नोटीस पाठवलेल्या इतर न्यायप्रविष्ट बाबी स्पष्ट होत नाहीत तोपर्यंत हे आमदार फ्लोअर टेस्टमध्ये कसे सहभागी होऊ शकतात? SC मध्ये अंतिम सुनावणी होत नसतानाही फ्लोअर टेस्ट घेतल्यास ही न्यायालयीन कारवाईचा अवमान होईल", असे अतिशय संतप्त आणि रोखठोक शब्दांत ट्विट करत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली असतानाच, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याविषयी पत्र पाठवले आहे. विधीमंडळातील बहुमत चाचणी विरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांच्या आदेशाविरोधात याचिका दाखल केली आहे. राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. तसेच शिवसेनेतील बंडखोर आमदारांचा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्या मुंबईत पोहोचणार असल्याची माहिती स्वत: एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.