अत्यंत नाट्यमय घडामोडी घडून काल अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ नेत्यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेत सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आपल्याला ४० हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार यांनी केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याचे मानले जात आहे. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने आता काँग्रेस हा महाविकास आघाडीमधील मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेत्यांकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यात येत आहे. ज्या पक्षाचे अधिक सदस्य त्यांचा विरोधी पक्षनेता व्हायला पाहिजे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षनेता घोषित केला आहे, त्याबाबत तुमचं काय मत आहे, असं विचारलं असता बाळासाहेब थोरात म्हणाले की, अशा प्रकारे विरोधी पक्ष नेता जाहीर करता येत नाही. शेवटी ज्यांचं विधानसभेत संख्याबळ जास्त आहे. आमदार जास्त आहेत. त्यांचाच विरोधी पक्षनेता होतो. याबाबत महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल. तसेच सध्या काँग्रेसचं संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता व्हायला हवा, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगिलते.
राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत काँग्रेसचे सदस्य तसेच वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली जाणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीचा महाविकास आघाडीवर परिणाम होणार नाही, उलट महाविकास आघाडीमधील वज्रमुठ अधिक पक्की होणार, असा विश्वासही बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीबाबत बाळासाहेब थोरात यांनी काल चिंता व्यक्त केली होती. थोरात म्हणाले होते की, २०१४ पासून देशात लोकशाही व राज्यघटना त्याचबरोबर पक्षांतर बंदी कायद्यावर आघात होतो आहे हे काळजी करायला लावणारे आहे. राज्यात आज घडलेल्या घटना जनता सर्व पाहते आहे .याबाबत राज्यातील जनताच निर्णय करणार असून जनतेचा न्यायालय हे सर्वश्रेष्ठ न्यायालय आहे. मात्र आजची घडलेली घटना ही लोकशाही आणि राज्यघटनेकरिता दुर्दैवी असल्याची खंत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली होती. तसेच राज्यातील जनता महाविकास आघाडी सोबत असल्याचेही ते म्हणााले होते.