- रमाकांत पाटीलनंदुरबार : शिवसेनेतून बंड करुन आपल्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीत पोहोचलेले नेते एकनाथ शिंदे यांचा सत्तेचा नवीन समीकरणाचा मार्ग यशस्वी होण्याचे आशादायी संकेत मिळू लागताच शिवसेनेतील इतर आमदारही गुवाहाटीत दाखल होत आहेत. मात्र गुवाहाटी गाठताना हे आमदार व्हाया सुरत जात असल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसात सहा आमदार सुरतमार्गे गुवाहाटीला रवाना झाले आहेत.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह सोमवारी रात्री सुरतला दाखल झाले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप आला होता. पुढे महाराष्ट्रातील सत्तांतराच्या षडयंत्राचा डाव बदलत गेला आणि बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास शिंदे व त्यांचे समर्थक आमदार सुरत सोडून गुवाहाटीला रवाना झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा एकनाथ शिंदे सुरतला दाखल झाले त्यावेळी त्यांच्यासोबत २७ आमदार होते. मात्र सुरतच्या हॉटेलमध्ये मुक्काम असतानाच २४ तासात ही संख्या ३३ पर्यंत गेली. हे सर्व ३३ जण सुरतच्या विमानतळावरुन विशेष विमानाने गुवाहाटीला गेले. त्यानंतरही मात्र शिंदे यांना समर्थन देणाऱ्या आमदारांची संख्या वाढतच आहे.
धोका नको म्हणून नेले जात आहे सुरतमार्गे मुंबईत शिवसेनेचा दबदबा असल्याने धोका नको म्हणून सुरतमार्गे गुवाहाटीकडे हे आमदार जात असल्याचे सांगितले जात असले तरी एकनाथ शिंदे यांचे ज्या हॉटेलमध्ये वास्तव्य होते तेथेच काहीतरी ‘शिजत’ असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील होऊ घातलेल्या सत्तांतराच्या घडामोडीत ‘सुरत’ केंद्रस्थानी बनल्याचे मानले जात आहे.
दिमतीला विशेष विमान- या समर्थनासाठी गेल्या दोन दिवसात अनेक आमदार गुवाहाटीला पोहोचले आहेत. मात्र गुवाहाटीला जाताना हे आमदार सुरत व्हाया जात असल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला आहे. - एकनाथ शिंदे सुरतमधील ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्याच हॉटेलमधून बुधवारी सायंकाळी तीन आमदार विशेष विमानाने गुवाहाटीकडे रवाना झाले. गुरुवारीदेखील सकाळी अशाच पद्धतीने पुन्हा तीन आमदार गुवाहाटीकडे रवाना झाले.