मुंबई - राज्यात कधी कोणता नेता कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेईल. याचा नेम नाही. गेल्या दोन वर्षांतील राजकीय घडामोडींमुळे ही बाब वारंवार अधोरेखित झाली आहे. त्यामध्ये राजकारणात काकांचा हात सोडणारे पुतणे महाराष्ट्राला नवीन नाहीत. २ जुलैला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपले काका ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा विरोध डावलून आपल्या गटासह भाजपसोबत चूल मांडली. यापुर्वी काका-पुतण्यांचे असे अनेक अध्याय महाराष्ट्राने पाहिले आहेत.
बाळासाहेब ठाकरे - राज ठाकरे
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून राजकारणाचे धडे गिरवलेले नेते राज ठाकरे यांना शिवसेनेमध्ये भक्कम समर्थन आणि कार्यकत्यांचे पाठबळ होते. पण आपल्याला डावलले गेल्याच्या भावनेतून त्यांनी २७ नोव्हेंबर २००५ मध्ये शिवसेना सोडली. १९ मार्च २००६ रोजी त्यांनी मनसे या नव्या पक्षाची स्थापना केली.
गोपीनाथ मुंडे- धनंजय मुंडे
भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार म्हणून पुतणे धनंजय मुंडे यांच्याकडे पाहिले जात होते. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. २००९ मध्ये पंकजा मुंडे यांची एंट्री झाली. अन् धनंजय मुंडे दुखावले गेले. यातूनच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा वाढविला. २०१३ मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला.
अनिल देशमुख - आशिष देशमुख
राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, पुतणे आशिष देशमुख यांच्यातील संघर्ष नवीन नाही. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत भाजपमधून लढलेल्या आशिष देशमुखांनी अनिल देशमुख यांचा पराभव केला. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. २०१९ मध्ये थेट फडणवीस यांच्याविरोधात लढले. काँग्रेसने निलंबित केल्यानंतर ते १८ जून २०२३ मध्ये भाजपात गेले.
सुनील तटकरे- अवधूत तटकरे
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे यांनी राष्ट्रवादीतूनच कारकिर्दीला सुरुवात केली. २०१९ मध्ये चुलत बहीण अदिती तटकरे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. त्यामुळे अवधूत हे काही काळ राजकारणापासून लांब राहिले. पुढे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेना प्रवेश केला होता. शिवबंधन तोडून त्यांनी १४ ऑक्टोंबर २०२२ रोजी भाजपात प्रवेश केला
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काका शरद पवार यांची राजकीय साथ सोडली व आपल्या आमदारांसोबत भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी १९८२ मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यावर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली
क्षीरसागर काका-पुतणे
काही वर्षापूर्वी जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. ते बीडमध्ये आमदार होते. २०१९ मध्ये संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे बीडमधून आमदार झाले. बीडमध्ये रंगलेला क्षीरसागर काका-पुतणे असा सामना अनेकांनी पाहिला. जिल्ह्यातील राजकारण मुंडे घराण्याबरोबर क्षीरसागर घराण्यामुळेही चर्चेत येते.