मंत्रिमंडळ बैठकीत कोरोना, शेती आदीवर चर्चा झाली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील त्यास राष्ट्रवादी, काँग्रेसच्या मंत्र्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. असे असताना ठाकरेंनी ताबडतोब शिवसेनेचे मुंबईत असलेले आमदार आणि पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
दुसरीकडे देवेंद्र फडणवीस दिल्लीत अमित शहा, जे पी नड्डांना भेटून मुंबईत दाखल झाले आहेत. तिकडे शिंदे यांनी आता उद्धव ठाकरेंना थेट प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. असे असताना शिंदे गटासोबत असलेले आमदार बच्चू कडू अपक्षांना घेऊन उद्या मुंबईत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हे आमदार राज्यपालांना भेटून ठाकरे सरकारविरोधात अल्पमताचे पत्र देण्याची शक्यता आहे. असे झाल्यास येत्या काही दिवसांत विशेष अधिवेशन होऊन त्यामध्ये बहुमत सिद्ध करावे लागण्याची शक्यता आहे.
या साऱ्या घडामोडींवर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत बंडखोर आमदारांवर तोंडसुख घेत आहेत. तर उद्धव ठाकरे आमदारांना परत येण्याचे आवाहन करत आहेत. यावर एकनाथ शिंदे यांनी सवाल उपस्थित केला आहे. आम्ही काय समजायचे? असे शिंदे यांनी ठाकरेंना विचारले आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पुढील घडामोडींचा विचारविनिमय करण्यासाठी तातडीने आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. मातोश्रीवर ही बैठक सुरु होत आहे. राजीनामा द्यावा की बहुमत प्रस्तावाला सामोरे जावे यामध्ये उद्धव ठाकरे संभ्रमात अडकल्याचे बोलले जात आहे.
राज्य सरकारच्या या कॅबिनेट बैठकीत शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतराचा प्रस्ताव आणला आहे. उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घ्यावा असं परब यांनी सांगितले. अनिल परब म्हणाले की, वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांना मुंबईत भूखंड द्यावा असाही प्रस्ताव देण्यात आला आहे. राजकीय विषय कॅबिनेट बैठकीत होत नाहीत. कॅबिनेटमध्ये राज्य सरकारची धोरणांवर चर्चा होते.औरंगाबाद शहराचं नामांतरण संभाजीनगर करावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली आहे. हा प्रस्ताव मंत्रिमंडळात आणावा. उद्या यावर निर्णय होऊ शकेल.