ठाकरे सरकारवर बहुमत चाचणीची टांगती तलवार असताना २४ तासांत दुसरी मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये औरंगाबादसह तीन शहरांच्या नामांतराचा प्रस्ताव मांडला जाणार आहे. कालपर्यंत मंत्रिमंडळ बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगला उपस्थित राहणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज स्वत: मर्सिडीज चालवत मंत्रिमंडळ बैठकीला निघाले आहेत.
कालच्या बैठकीत मंत्री अनिल परब यांनी औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर कारावे, उद्याच्या बैठकीत यावर ठराव संमत करावा अशी मागणी केली होती. याचबरोबत उस्मानाबादचे देखील नामांतर प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. या शहराचे नाव धाराशिव असे करण्याची मागणी आहे. असे असताना मुख्यमंत्री या महत्वाच्या बैठकीला जातीने हजर राहणार आहेत. अनिल परब मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसले होते, तर आदित्य ठाकरे हे पाठीमागच्या सीटवर बसले होते.
दुसरीकडे राज्यपालांनी दिलेल्या बहुमत चाचणीच्या आदेशाला ठाकरे सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यावर थोड्याच वेळात सुनावणी सुरु होणार आहे. अशावेळीच ठाकरे सरकारची मंत्रिमंडळ बैठक होत आहे. यामुळे कदाचित सर्वोच्च न्यायालय़ाचा निकाल पाहून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. असे झाल्यास ही ठाकरे मंत्रिमंडळाची शेवटची बैठकही ठरू शकते.