मुंबई - राज्यातील सत्ता संघर्षात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा पत्राच्या माध्यमातून परत येण्याचं आवाहन केल्यानंतरही शिंदे गट आपल्या भूमिकेवर ठाम आहे. याच दरम्यान तीन शहरांच्या नामांतरावरून बोलविलेल्या ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीला आता सुरुवात झाली आहे.
काँग्रेसचे मंत्री वर्षा गायकवाड, अस्लम शेख हे दोघे बैठकीतून बाहेर पडल्याचं समोर आलं आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी याबाबत आता खुलासा केला आहे. फाईल राहिली होती म्हणून बाहेर आले होते असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. तर अस्लम शेख हे या बैठकीतून नेमके का बाहेर पडले? याबाबतचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
अनिल परब यांनी बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर कारावे, उद्याच्या बैठकीत यावर ठराव संमत करावा अशी मागणी केली होती. याचबरोबत उस्मानाबादचे देखील नामांतर प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. या शहराचे नाव धाराशिव असे करण्याची मागणी आहे. ठाकरे सरकारवर बहुमत चाचणीची टांगती तलवार असताना २४ तासांत दुसरी मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली आहे.