शिवसेनेचे मंत्री आणि ठाण्यातील नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आहे. त्यांच्यासोबत ३५ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये एक अपक्षही आमदार आहेत. शिंदे यांनी आपल्यासोबत यापैकी काही आमदारांना नेले आहेच, परंतू ठाण्यातील त्यांचे खास पदाधिकारीदेखील सुरतला गेले आहेत. परंतू, शिंदेंचे खासदार पूत्र कुठे आहेत? याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
श्रीकांत शिंदे हे कालच अचानक परदेशात निघून गेल्याचे काही जण चर्चा करत आहेत. परंतू, ना परदेशात, ना सुरतमध्ये आहे. तर खासदार श्रीकांत शिंदे हे ठाण्यातच आहेत. सकाळीच त्यांच्याशी लोकमतने संपर्क साधला होता. मात्र, ते आपल्या निवासस्थानी नाहीत, तर अज्ञात ठिकाणी गेले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर दररोज जी वर्दळ असते ती खूपच कमी झालेली आहे. त्यांचे रोजचे कार्यकर्ते देखील शिंदेंच्या घरी फिरकलेले नाहीत. जे आले ते नजरानजर लपवत आहेत. शिंदे यांनी आपले काही खंदे शिलेदार आपल्यासोबत सुरतला नेले आहेत. या शिलेदारांचे फोनही नॉट रिचेबल येत आहेत. आनंद मठामध्येही वर्दळ कमालीची रोडावली आहे. ठाण्यातील काही आमदार ठाण्यातच असले तरी प्रताप सरनाईक मात्र शिंदेंसोबत असल्याचे समजते आहे.
किती आमदार मुंबईत...दरम्यान, दादा भुसे मुंबईतच असल्याचे स्पष्ट झाले होते. परंतू माजी मंत्री संजय राठोड देखील सेंट रेजीस हॉटेलमध्येच होते. याच हॉटेलमध्ये शिवसेनेने विधान परिषद निवडणुकीसाठी आमदारांना ठेवले होते. परंतू या हॉटेलमध्ये १४ आमदार होते. या आमदारांसोबत प्रत्येकी दोन दोन शिवसैनिक ठेवण्यात आले आहेत. मध्यरात्रीनंतर २ -३ वाजता या कट्टर शिवसैनिकांना वर्षावर बोलविण्यात आले होते. यामुळे शिंदे यांनी बंड केल्याचे ठाकरेंना समजले होते.