थोड्याच वेळात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यापूर्वी एकनाथ शिंदेंसह एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिवसेना आमदारांनी पक्ष नेतृत्वाविरोधात बंड का पुकारले याचे महत्वाचे कारण समोर येत आहे. एकनाथ शिंदेंसोबत थोडे थोडके नव्हे तर ३५ आमदार असल्याचा दावा केला जात आहे. या आमदारांनी आपली भूमिका ठरविल्याचेही समजते आहे.
एकनाथ शिंदे यांनी रातोरात दोन गटांमध्ये शिवसेनेचे नाराज आमदार गुजरातच्या सुरतला हलविले. यासाठी सुरतचे ली मेरिडिअन हॉटेलही बुक करण्यात आले होते. एवढी तयारी काही रातोरात झालेली नव्हती. तर शिवसेनेचे आमदार काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्यावरून नाराज असल्याचा दावा करण्यात येत आहे. या आमदारांनी शिवसेना भाजपासोबत गेल्यास आम्ही तुमच्यासोबत राहू असेही म्हटल्याचे समोर येत आहे. एबीपी माझाने याचे वृत्त दिले आहे.
शिवसेनेच्या आमदारांना विकासनिधी मिळत नाही, मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कामांना हा निधी दिला जातो. यावेळी आमदारांना विश्वासातही घेतले जात नाही. याच्या तक्रारी उद्धव ठाकरेंकडे केल्यावर त्याची दखलही घेतली जात नाही, अशा तक्रारी शिवसेना आमदारांच्या होत्या. या साऱ्या वातावरणातच राज्यसभेला शिवसेनाचा उमेदवार पडला, याची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत मध्यरात्री पोहोचलेल्या आमदारांमध्ये रमेश बोरणारे, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, उदयसिंग राजपूत, संदीपान भुमरे, प्रदीप जैस्वाल हे आहेत. या आमदारांना शिंदे यांनी मोठया प्रमाणात विकासनिधी दिला आहे. दुसरीकडे राजन विचारे, रविंद्र फाटक हे ठाण्यातच आहेत. प्रताप सरनाईक यांचा फोन मात्र नॉट रिचेबल येत आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे हे आज दुपारी सूरतमध्येच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे वृत्त आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या नाराजीमुळे राज्यातील राजकारणात भूकंप झाला असून, त्यांची नाराजी दूर करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यातच एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार वास्तव्य करून असलेल्या हॉटेलबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे