मुंबई - मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात जो सत्तासंघर्ष सुरू होता त्याला अखेर मोठा ट्विस्ट मिळाला आहे. भाजपा-शिंदे गट एकत्र येऊन सरकार स्थापन करतील आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सुरू होती. परंतु फडणवीसांनी मास्टरस्ट्रोक मारत थेट पुढील मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेतील अशी मोठी घोषणा केली.
राजभवनात भाजपा-शिंदे गट एकत्र येत सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र येत आहोत. आमच्याकडे दोन तृतीयांश आमदारांचे पाठबळ आहे. ५० आमदार एकत्र आहोत. अडीच वर्षापूर्वी काय घडलं ते सगळ्यांना माहिती आहे. या काळात आम्ही मतदारसंघातील कामे, अडचणी याबाबत वारंवार तत्कालीन मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. आपण एकत्र निवडणुका लढवल्या. त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली. परंतु आमदारांमध्ये असलेली खदखद, मतदारसंघातील प्रश्न आणि पुढच्या निवडणुकीत लढवणं आणि जिंकणे ही समस्या सांगितले. सत्ताधारी पक्षातून विरोधी पक्षात येणाऱ्या आमदारांची संख्या पाहता आत्मपरिक्षण करण्याची आवश्यकता होती. महाविकास आघाडीत काही निर्णय घेता येत नव्हते. मर्यादा येत होत्या असं त्यांनी सांगितले.
तसेच हा वेगळा निर्णय राज्याच्या हितासाठी, महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील अपेक्षा पूर्ण करण्यासाठी घेतला. या निर्णयाला भाजपाने पाठिंबा दिला. जवळपास १२३ संख्याबळ भाजपाकडे आहे. असे असतानाही मुख्यमंत्रिपद ते घेऊ शकले असते. परंतु मनाचा मोठेपणा दाखवत बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला. मोठे मन दाखवलं. त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपा नेत्यांचे आभार मानतो असंही शिंदे यांनी सांगितले. जे काही घडले जी अपेक्षा राज्यातील जनतेची आहे. ती पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र एक करू. या राज्याला विकासाकडे घेऊन जाण्याचं काम करू. इतक्या मोठ्या मनाचा माणूस राज्याच्या विकासासाठी आमच्यासोबत आहेत. आत्ताच्या राजकारणात काय होईल हे पाहता. परंतु संख्याबळ असताना पद दुसऱ्याला देणं हा त्याग आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, ५० आमदारांमध्ये काही मंत्री आहेत. आपापल्या मतदारसंघात ताकदवान आहे. एकीकडे खूप मोठे नेते आहे. एकनाथ शिंदेसारख्या छोट्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवला. ५० आमदारांनी वैचारिक भूमिका घेत बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची आणि आनंद दिंघेंच्या विचारांचा सन्मान सहकारी आमदारांनी केला. त्यांचे आभार आहे. अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आमदारांनी केले. या आमदारांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याला तडा जाऊन देणार नाही. आता आपली ताकद वाढली आहे. मजबूत सरकार महाराष्ट्रात स्थापन होईल. हे सरकार लोकांच्या मनातील अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.