अशोक चव्हाण यांचा काँग्रेसला राम-राम, आमदारकीही सोडली; पुढील वाटचालीबाबत चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 12:56 PM2024-02-12T12:56:03+5:302024-02-12T13:13:14+5:30
Ashok Chavan News: आज दुपारी काँग्रेसमध्ये भूकंप घडवणारी माहिती समोर आली असून, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचाही राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या साडेचार वर्षांपासून सुरू असलेली उलथापालथी आणि फोडाफोडीच्या मालिकेने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा वेग घेतला आहे. गेल्या दीड वर्षांत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असली तरी काँग्रेस मात्र एकसंध होता. मात्र आज दुपारी काँग्रेसमध्ये भूकंप घडवणारी माहिती समोर आली असून, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. आता आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांच्या पुढील राजकीय वाटचालीबात काय निर्णय घेणार याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.
अशोक चव्हाण यांचा फोन आज सकाळपासून बंद असल्याने ते नॉट रिचेबल झाल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. त्याचदरम्यान, अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिची सूत्रांनी दिली आहे. तसेच काही वेळाने त्यांनी काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचीही माहिती समोर येत आहे. अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं आहे. तसेच दुपारी तीन वाजल्यानंतर स्वतः अशोक चव्हाणच या संदर्भात भूमिका स्पष्ट करतील, असेही सांगण्यात येत आहे.
मुंबई - माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोच चव्हाण यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा pic.twitter.com/TpWooTgNTz
— Lokmat (@lokmat) February 12, 2024
दरम्यान, अशोक चव्हाण हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्यासोबत मराठवाड्यातील काँग्रेसचे काही आमदारही राजीनामा देतील, अशीही चर्चा सुरू आहे. या घडामोडींमुळे काही दिवसांवर आलेल्या राज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
आज सोमवार, दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) February 12, 2024
Today i.e. on Monday, February 12, 2024, I have tendered my resignation as Member of Legislative Assembly (MLA) from 85-Bhokar…