नागपूरचे विधिमंडळ अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असताना शिवसेनेचे कार्यालय कोणाला? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला की उद्धव ठाकरे यांच्या गटाला यावरून विधानभवनात वातावरण चांगलेच तापले. अखेर उद्धव ठाकरे गटाला हे कार्यालय देण्यात आले. राज्यात गेल्या जूनमध्ये सत्तांतर झाले. त्यानंतर मुंबईत झालेल्या विधिमंडळ अधिवेशनातदेखील शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाला की ठाकरे गटाला यावरून पेटला होता. ठाकरे गटाने कार्यालयावर ताबा मिळवला होता. नागपुरातही प्रकार घडला आहे.
नागपूर विधानमंडळ विधान भवन परिसरात असलेले शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाला दिले जात आहे आणि तसा लेखी आदेशही येत असल्याची कुणकुण लागतात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे नागपूरच्या विधानभवनात पोहोचले तेथे त्यांनी विधानमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांना जाब विचारला आणि असला प्रकार खपवून घेणार नाही असा दम दिला.
विधान मंडळाच्या रेकॉर्डनुसार आजही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना हीच खरी शिवसेना आहे मग शिंदे गटाला कार्यालय कोणत्या अधिकारात दिले जात आहे असा सवाल दानवे यांनी केला. दुसऱ्या गटाला कुठे कार्यालय द्यायचे की नाही द्यायचे हे तुमचे तुम्ही ठरवा पण आमच्या कार्यालयाला धक्का लावू नका असे त्यांनी बजावले. ठाकरे गटाला हे कार्यालय देण्यास भागवत यांनी यावेळी सहमती दर्शवली अशी माहिती सूत्रांनी दिली.
मात्र एकनाथ शिंदे गटही आता आक्रमक होणार आहे.शिवसेनेचे कार्यालय आम्हालाच मिळाला हवे अशी भूमिका या गटाचे प्रतोद भरत गोगावले हे काही वेळातच भागवत यांना भेटून मांडणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेना कार्यालय कोणाचे यावरून संघर्ष होण्याची चिन्ह आहेत.