Maharashtra Politics- आज महाराष्ट्राच्या राजकारणात दुसऱ्यांदा मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची तर इतर नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. यात राष्ट्रवादीच्या काही बड्या नेत्यांचाही समावेश असल्यामुळे, हे बंड शरद पवारांच्या मर्जीनेच झाले का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या दरम्यान, शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांच्या बंडावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी शरद पवार म्हणाले, अलीकडेच देशाच्या प्रधानमंत्र्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाबद्दल वक्तव्य केले होते. त्यांनी राष्ट्रवादी पक्ष भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष असल्याचे म्हटले. हे सांगत असताना त्यांनी राज्य सहकारी बँकेचा उल्लेख केला तसेच सिंचन विभागाबद्दल जी तक्रार होती याचा उल्लेख केला. मला आनंद आहे, आज त्यांनी राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांनाच शपथ दिली. म्हणजे मोदींनी केलेले आरोप हे वास्तव नव्हते. या आरोपातून या सर्वांना मुक्त केले, या बद्दल पंतप्रधानांचा आभारी आहे, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले, 6 जुलै रोजी पक्षआची बैठक बोलावली होती, मात्र त्याआधी काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली. किती लोकांनी वेगळी भूमिका घेतली, हे लवकरच समोर येईल. आजचा हा प्रकार माझ्यासाठी नवा नाही, 1980 साली मला अनेक जण सोडून गेले होते, तेव्हा मी पक्ष पुन्हा बांधला. त्यामुळे हा प्रकार माझ्यासाठी नवीन नाही. त्यावेळी ज्यांनी पक्षाला सोडलं, त्यापैकी 3 ते 4 जण सोडले तर सर्वजण पराभूत झाले. माझा राज्यातील जनतेवर पूर्ण विश्वास आहे, असंही पवार म्हणाले.
यावेळी त्यांना विचारण्यात आले की, अजित पवारांनी पक्षावर दावा केला आहे. या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, जे घडलं त्याची मला चिंता नाही. पक्षावर दावा केला तर मी लोकांमध्ये जाणार. मी न्यायालयात जाणार नाही, जनता योग्य तो निर्णय घेईल. जे गेले, त्यांच्या भविष्याची चिंता मला आहे. या गोष्टीचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाते. मोदींनी वक्तव्य केल्यामुळे आमचे काही नेते अस्वस्थ होते. काहींच्या मागे ईडी लावलेली होती, त्यामुळेच त्यांची अस्वस्तता वाढली आणि आजचा प्रकार घडला आहे.