Maharashtra Politics : काल(दि. 2 जुलै 2023) महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप झाला. कट्टर प्रतिस्पर्धी असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा एकत्र आले. NCP नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. यावेळी अजित पवारांसह नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या अचानक घडलेल्या घडामोडीमुळे राज्यातील जनताही गोंधळून गेली आहे. आम्ही मतदान केले एकाला, सत्ता स्थापन केली दुसऱ्याने अन् युती केली तिसऱ्यानेच, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत. यातच आता 'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर 2022' कार्यक्रमातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
गेल्या वर्षी 'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर' पुरस्कार सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'महामुलाखत' अभिनेते नाना पाटेकर यांनी घेतली होती. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या नाना पाटेकर यांनी पहिल्याच प्रश्नात बॉम्ब टाकला. "मतदार म्हणून आम्हाला किंमत आहे का?" असा प्रश्न नानांनी विचारला. यावेळी उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.
नानांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आमची किंमत तुमच्या भरवशावर ठरते आणि तुमची किंमत कमी झाली तर आमची कशी राहील?", असं फडणवीस म्हणाले. लोकमतच्या कार्यक्रमातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करुन भाजपसोबत सरकार स्थापन केले, आताही तसाच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडला. त्यामुळे पुन्हा एकदा 'मतदार म्हणून आम्हाला किंमत आहे का?' असा प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारण्याची वेळ आली आहे, असे मत अनेकजण व्यक्त करत आहेत.