मुंबई: शिवसेनेचे मंत्री आणि ठाण्यातील नेते बडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले आहे. त्यांच्यासोबत ३५ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये एक अपक्षही आमदार आहेत. शिंदे यांनी आपल्यासोबत यापैकी काही आमदारांना नेले आहेच, तसेच ठाण्यातील खास पदाधिकारीदेखील सूरतला गेले असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता शिवसेन पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितल्यास सातव्या मजल्यावरून उडी मारू असं म्हणणारे शिवसेनेचे एक कट्टर आमदार नॉट रिचेबल असल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे कट्टर शिवसैनिक म्हणून समजले जाणारे अनेक आमदार उद्धव ठाकरेंच्या विरोधात असल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरेंनी सांगितल्यास सातव्या मजल्यावरून ही उडी मारू असे म्हणणारे पैठणचे आमदार आणि मंत्री संदीपान भुमरे एकनाथ शिंदेंच्या सोबत गेलेत.
उद्धव ठाकरेंनी सांगितल्यास ७व्या मजल्यावरून उडी मारु
तत्पूर्वी, सन २०१९ च्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर भाजप-शिवसेना यांच्यात सत्तासंघर्ष सुरु होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची बैठक बोलावून त्यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यांनतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी बोलताना शिवसेना आमदार भुमरे म्हणाले होते की, सत्तास्थापनेबाबत उद्धव ठाकरे जो आदेश देतील तो आदेश आमच्यासाठी अंतिम असेल. उद्धव ठाकरेंनी जर आम्हाला सातव्या मजल्यावरून उडी मारण्याचे आदेश दिले तर, ते ही करू, अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिकिया दिली होती.
एकनाथ शिंदे आमच्या सर्वांचे सहकारी आणि मित्र
एकनाथ शिंदे आमच्या सर्वांचे सहकारी आणि मित्र आहे. अनेक वर्ष आम्ही पक्षात काम केले. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंसोबत त्यांनी काम केले. त्यांचा गैरसमज दूर झाला असेल तर तो दूर केला जाईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आमचा संपर्क सर्व पक्षातील नेत्यांशी होता. राज्यसभेसह विधान परिषदेच्या निवडणुकीतही सर्व पक्षांनी आम्हाला मदत केली. शिवसेनेतील नाराजीचे चित्र उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीतही दिसू शकेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच राज्यसभेत भाजपने उभे केलेले तीनही उमेदवार निवडून आले. त्यानंतर विधान परिषद निवडणुकीतही पाचही उमेदवार निवडून आले. हा देवेंद्र फडणवीस यांच्या चाणाक्षपणाचा उत्तम नमूना आहे. आम्हाला मदत केलेल्या सर्वांना धन्यवाद देतो, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.