Maharashtra Politics ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार असून राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजपानेही मोठी तयारी केली, काल मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मोठं विधान केलं. 'विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वात महायुतीचेच सरकार येणार, असा विश्वास व्यक्त करून २०२९ मध्ये मात्र भाजप राज्यात स्वबळावर सत्तेत येईल', असं विधान शाह यांनी केलं. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
काल मुंबईत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत शाह यांनी पदाधिकाऱ्यांना निवडणुकांबाबत सूचना दिल्या. शाह ( Amit Shah ) यांनी मुंबईतील पक्षांतर्गत लहानमोठे वाद तातडीने मिटवा, एकत्र बसा असा आदेश दिला. आज मी जे सांगतो आहे ते लिहून घ्या आणि त्यानुसार वागा असा सल्लाही त्यांनी दिला. मुंबई भाजपमधील ( BJP ) गटबाजीचा थेट उल्लेख न करता त्यांनी कानउघाडणी केली.
केंद्रीय मंत्री शाह यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, सगळ्यांनाच आपला पक्ष वाढवायचा आहे. पण, महाराष्ट्रामध्ये एकाच पक्षाचं सरकार येऊ शकत नाही. राज्याची राजकीय भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. इतर राज्यांमध्ये एका पक्षाचे सरकार येऊ शकतं, मात्र महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी आहे. १९८५ नंतर चाळीस वर्षात राज्यात एका पक्षाचे सरकार कधीच आलं नाही, असंही अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या विधानावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, २०२४ मध्ये महायुतीचे सरकार येईल. २०२९ ला अजून वेळ आहे, अशी एका वाक्यात सीएम शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
आमदार जयंत पाटील काय म्हणाले?
जयंत पाटील म्हणाले, हरियाणा, जम्मू-कश्मीरमध्ये निवडणुका होत आहेत. पण भाजपाच्या नेत्यांना महाराष्ट्रात येऊन बसण्याची वेळ आली, म्हणजेच महाराष्ट्रात किती मोठा खड्डा पडला आहे हे दिसते. २०२४ मध्ये तर आपण निवडून येणार नाही म्हणूनच २०२९ चे विधान भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून केले जात आहे, असा टोला जयंत पाटील यांनी शाह यांचे नाव न घेता लगावला. ( Maharashtra Politics )