पुणे - राज्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांना सोबत घेत भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. दरम्यान, गेल्या काही दिवसांत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यातच आज भीमाशंकर येथे दर्शनासाठी गेले असताना एकनाथ शिंदे यांनी राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. मात्र ही भेट सदिच्छा भेट असून, त्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, असे दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज भीमाशंकर येथे दर्शनासाठी गेले होते. तिथे दर्शन आटोपून झाल्यानंतर शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली. यावेळी वसळे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले.
या भेटीबाबत माहिती देताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज माझ्या मतदारसंघात श्री भीमाशंकर क्षेत्राचे दर्शन घेण्यास आले होते. चहापानाच्या निमित्ताने त्यांनी माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. मुख्यमंत्र्यांचे आदरपूर्वक स्वागत व पाहुणचार आम्ही केला. महाराष्ट्राच्या राज्यप्रमुखांच्या औपचारिक दौऱ्यातील ही सहजभावपूर्ण अगत्यशीलता होती. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. तसे प्रयोजन असण्याचे काहीच कारण नाही, असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.