Maharashtra Politics : मुंबई : उद्या महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे सहभागी होणार की नाही? याबाबत अद्याप संभ्रम आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत.
सध्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा बंगल्यावर चर्चा सुरु आहे. या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून असणार की नाही, याचा निर्णय थोड्याच वेळात होणार आहे. तसेच, महायुतीचा मुख्यमंत्री ठरला असला तरी अद्याप खातेवाटप झालेले नाही. याशिवाय, उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात कोण-कोण नेते मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. याबाबतची सर्व माहिती देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या या बैठकीतनंतर मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदासह गृहखातं मिळावे, अशी शिवसेनेची मागणी आहे. पण भाजप हे खातं सोडण्यास तयार नाही. त्यामुळे आता एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यंत्री असताना त्यांनी गृहखातं हे आपल्याकडे ठेवले होते. त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री झाले तर त्यांनी देखील गृहखातं स्वत:कडे ठेवावं, अशी मागणी शिवसेनेची आहे.
दुपारी काय म्हणाले एकनाथ शिंदे?आज भाजपने देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाच्या नेतेपदी एकमताने निवड झाली आहे. यानंतर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची महायुतीच्या नेत्यांनी भेट घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी तुम्हीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदेंनी म्हटले की, अडीच वर्षांपूर्वी याच ठिकाणी मी मुख्यमंत्री व्हावं, ही शिफारस देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं यासाठी मी शिफारस केली आहे. देवेंद्रजींनीही आता सांगितलं..संध्याकाळपर्यंत तुम्हाला सगळं कळेलच.