Maharashtra Politics ( Marathi News ) :धनंजय मुंडे यांनी काल मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची देवगीरी बंगल्यावर बैठक घेतली. या बैठकीत अजित पवार यांनी नेत्यांना मार्गदर्शन केले. कोणत्याही नेत्याने आपल्या कार्यकर्त्यावर पूर्णपणे किंवा आंधळेपणाने विश्वास टाकू नये, असा सल्ला अजित पवार यांनी नेत्यांना दिला. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात वाल्मीक कराड मुख्य आरोपी आहे, या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी सुरू होती.
अखेर हकालपट्टी… राजीनामा देता की बडतर्फ करू? CM फडणवीसांनी दम देताच धनंजय मुंडेंचा राजीनामा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घेतलेल्या बैठकीत नेत्यांना सूचना दिल्या. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचे उदाहरण दिले. परावलंबी न होता स्वावलंबी होण्याचा कानमंत्र दिला. नेत्यासोबत कार्यकर्ते व्यवस्थित नसतील तर त्याची झळ नेत्यासोबत पक्षाला देखील कशाप्रकारे बसते हे धनंजय मुंडे प्रकरणातून आपल्याला दिसून आले आहे, असंही अजित पवार यांनी सांगितलं.
अजित पवार यांनी आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत नेत्यांना सूचना दिल्या. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपल्या आजुबाजूला कोणते कार्यकर्ते आहेत याची माहिती घ्या. कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण नको. परावलंबी न होता स्वावलंबी व्हा, असा सल्लाही पवार यांनी दिला.
धनंजय मुंडे यांनी काल राजीनामा दिला
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो सोमवारी संध्याकाळी समोर आल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा जोरात सुरू झाली. सरकारवर दबाव वाढला आणि अखेर तीन महिन्यांनंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीवरून मुंडे यांचा राजीनामा मंजूर केला आहे.
संतोष देशमुख यांना झालेल्या अमानुष मारहाणीचे फोटो व्हायरल होऊ लागले आणि त्यावर राग अन् रोष व्यक्त होऊ लागला. ही बाब अजित पवार यांच्या पक्षासाठी आणि सरकारसाठीही अडचणीची ठरत आहे, हे लक्षात आल्यानंतर तातडीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी रात्री नऊच्या दरम्यान बैठक पार पडली.