उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना खा.श्रीकांत शिंदे व आ.संजय शिरसाट यांच्याविषयी प्रश्न विचारल्यानंतर ते थुंकल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. त्यावरून आता भाजप-शिवसेना युतीच्या नेत्यांनी राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.खा.श्रीकांत शिंदे यांच्याविषयी शुक्रवारी राऊत यांना पत्रकारांनी एक प्रश्न विचारला असता, ते कोण? कोण? असे म्हणत थुंकले. पत्रकारांनी गुरुवारी आ.शिरसाट यांच्याबाबत एका वाहिनीच्या पत्रकाराने प्रश्न विचारला असता ते असेच थुंकले होते.
राऊत यांच्या या थुंकण्यावरून आता वातावरण तापले आहे. शिंदे गटाचे आ.भरत गोगावले यांनी राऊत यांच्या थुंकण्याला आम्ही घाबरत नाही; किंमतही देत नाही, अशी प्रतिक्रिया दिली. शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी राऊत यांच्या अटकेची मागणी केली. राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, ते मागे तुरुंगात होते तसेच त्यांना आताही ठेवले पाहिजे, असे ते म्हणाले. भाजपचे आ.नितेश राणे यांनी राऊतवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.