Maharashtra Politics ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. महायुतीने राज्यात २३० जागा जिंकल्या. दरम्यान, आता मुख्यमंत्रिपद कोणत्या पक्षाला मिळणार या चर्चा सुरू आहेत. महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष हा भाजपा आहे, भाजपाने १३२ जागा जिंकल्या आहेत. यामुळे मुख्यमंत्री हा भाजपाचा होईल अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. पण दुसरीकडे शिवसेना शिंदे गटानेही मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटाच्या खासदारांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची वेळ मागितली. यावर आता खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रतिक्रिया दिली.
टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत खासदार जाधव यांनी मुख्यमंत्रिपदावरही भाष्य केले. खासदार प्रतापराव जाधव म्हणाले, मुख्यमंत्रिपदाबाबत आम्ही आधीच सांगितले आहे की, आमचे महायुतीचे तिनही नेते सक्षम आहेत. ते एकत्र बसून निश्चित चांगल्या प्रकारचा निर्णय घेतली. पण सगळ्यांच्या भावना निवडणुकीत सगळ्यांसमोर एकनाथ शिंदे यांचा चेहरा समोर होता, म्हणून शिवसैनिकांची आणि आमची सुद्धा इच्छा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे, झाले तर आनंद आहे. हा निर्णय महायुतीचे तिनही नेते एकत्र बसून घेणार आहेत.तो जो निर्णय घेतली तो निर्णय सगळ्यांना मान्य असेल, असंही खासदार प्रतावराव जाधव म्हणाले.
"मुख्यमंत्रिपदाबाबत अजूनही कोणता फॉर्म्युला ठरलेला नाही, महायुतीचे तिनही नेते एकत्र बसून चर्चा करतील. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मागितली आहे. मोदी यांनी जिथं सभा घेतल्या, अमित शाह यांनी जिथे सभा घेतल्या तिथं यश आले आहे. आम्ही त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी वेळ मागितली आहे, असंही खासदार जाधव म्हणाले.