मुंबई/नागपूर : राज्यातील सत्तारूढ महायुतीतील विधानसभा जागावाटपाच्या चर्चेला वेग आला असताना आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत २४ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या बैठकीत अंतिम फॉर्म्यूला निश्चित केला जाणार आहे.
अमित शाह हे २४ आणि २५ सप्टेंबरला नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि कोल्हापूर या शहरांमध्ये भाजपच्या नेत्यांकडून निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहेत. ते मराठवाड्यातील भाजप नेत्यांशी २४ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये चर्चा करतील. त्याच दिवशी रात्री ९ ते १० या वेळेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच या तीनही पक्षांचे अत्यंत निवडक नेते यांच्याशी चर्चा करतील. याच बैठकीत जागावाटपाला अंतिम रूप दिले जाईल. हा फाॅर्म्यूला पितृपक्षात जाहीर करायचा की नवरात्रात याचा निर्णयही याच बैठकीत होईल, असे सूत्रांनी सांगितले.
प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीची बैठक २३ सप्टेंबरला मुंबईत होणार आहे. त्यामुळे भाजपची ६० ते ७० उमेदवारांची पहिली यादी नवरात्रात जाहीर केली जाऊ शकते. भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी नवरात्रात उमेदवारांची घोषणा करण्यास मुंबईत घेतलेल्या बैठकीत मान्यता दिली होती, असेही सूत्रांनी सांगितले.
महायुतीतील काेणत्या पक्षाला काय हवे? कुठे अडले आहे जागावाटप?
महायुतीचे विद्यमान १८६ आमदार आहेत. ते सिटिंग - गेटिंग फॉर्म्यूल्यानुसार त्या त्या पक्षाला मिळतील, असे म्हटले जाते. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यातील सहा ते आठ मतदारसंघांबाबत अडचणी आल्या आहेत. महायुतीतील दोन पक्षांनी या मतदारसंघांवर दावा सांगितल्याने पेच निर्माण झाला आहे.
काही मतदारसंघ असे आहेत की जिथे तीन पक्षांपैकी एक पक्ष गेल्यावेळी फार कमी फरकाने पराभूत झालेला होता, अशा १४-१५ जागा असून, त्याबाबतही अडचण येणार नाही. उर्वरित जागांबाबत मात्र जोरदार रस्सीखेच आहे.
भाजपला कोणत्याही परिस्थितीत १५५ जागा हव्या आहेत. १३३ जागा दोघांमध्ये वाटून घ्यायला शिंदेसेना, अजित पवार गट यांची तयारी नाही. शिंदेसेनेला किमान १०० जागा हव्या आहेत आणि अजित पवार गट ६० पेक्षा कमी जागा घ्यायला तयार नाही. अमित शाह यांच्या दौऱ्यात हा तिढा सोडविला जाईल.