पुणे - महाराष्ट्रातील राजकीय भाषा खालच्या स्तराला गेली आहे. या राजकारण्यांना खडे बोल सुनावण्याचं काम साहित्यिकांनी केले पाहिजे. कुठल्याही ट्रोलिंगचा विचार करू नका. राजकारण्यांना ठणकावून सांगण्याची गरज आहे असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात केले आहे. ९८ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढील वर्षी दिल्लीत २१ ते २३ फेब्रुवारी या काळात होणार आहे. या संमेलनाच्या बोधचिन्हाचं राज ठाकरेंच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमात राज ठाकरे म्हणाले की, माझ्या आयुष्यातील सर्वात छोटं भाषण मी आज करणार आहे. साहित्यिकांसमोर आपण काय बोलणार, ज्यांची भाषा ऐकून आम्ही पुढे जातो, त्यांच्यासमोर बोलायचं नसते तर ऐकायचं असते. एवढी उज्ज्वल परंपरा साहित्यिकांशी आहे. महाराष्ट्राचं वेगळेपण इतर राज्यांपेक्षा काय हे इथं दिसून येते. मराठी साहित्य वाढवण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज लागेल, मदत लागेल त्यावेळी आम्ही आहोत. महाराष्ट्रातले साहित्यिक गेले अनेक वर्ष मी पाहत आलोय. मराठीबाणा प्रत्येकाच्या मनात अंगात रुजलेला असायचा. योग्यवेळी राजकारण्यांना जे ठणकावून सांगणे ही धमक, हिंमत जी काही वर्षापूर्वी होती ती आज कुठे तरी कमी दिसतेय असं वाटतं. महाराष्ट्रात चाललेला जो खेळ, सर्कस झालीय, कुणी विदुषकी चाळे करतंय, मंत्रालयात कुणी जाळ्यावर उडी मारतंय. महाराष्ट्राच्या राजकारणात अशी अनेक लोक आहेत त्यांना जाळ्यांशिवाय उड्या मारायला लावलं पाहिजे. ज्याप्रकारची भाषा राजकारणात वापरली जातेय. त्यांना कान धरून पुन्हा जमिनीवर आणणं हे शिकवणं, सांगणं, समजावून सांगणे हे तुमचं कर्तव्य आहे असं मी मानतो. त्या अधिकार वाणीने तुम्ही बोलू शकता, सांगू शकता असं राज ठाकरेंनी सांगितले.
तसेच आम्ही बोललं ट्रोल होते असं तुम्हाला वाटतं परंतु ट्रोलचा विचार करू नका. मी आजपर्यंत अनेक भाषणे दिली आहे, जे बोलायचे ते बोललो आहे परंतु सोशल मीडियात ज्या गोष्टी येतात त्या मी वाचायला जात नाही. त्या भानगडीत जात नाही. माझे बोलून झालंय ना, मग विषय संपला. कुठल्या गोष्टीचे स्पष्टीकरण द्यायला मी जात नाही. जे तुमच्यावर प्रेम करतात ते स्पष्टीकरण मागत नाही आणि जे तुमचा द्वेष करतायेत ते तुमचं स्पष्टीकरण ऐकत नाही. साहित्यिकांनी ही भूमिका घेतली पाहिजे. महाराष्ट्रातील राजकीय भाषा इतक्या खालच्या स्ताराला गेली, त्यांना समजवणारं कुणी नाही. ज्यांना बुर्जुग म्हणावे ते त्यांच्या आहारी लागलेत. ही जबाबदारी साहित्यिकांनी हाती घेणे गरजेचे आहे असं आवाहन राज ठाकरेंनी मराठी साहित्यिकांना केले.
दरम्यान, सध्या महाराष्ट्रात सामाजिक चळवळ साहित्यिकांनी उभी करणे गरजेचे वाटते. ज्याप्रकारची भाषा राजकारणात येतेय, आज जी लहान मुले आहेत जे भविष्यात राजकारणात येऊ इच्छितात त्यांना ही भाषा म्हणजे राजकारण आहे वाटतं. वाट्टेल ते बोलतात ते माध्यमे दाखवतात. माध्यमांनी हे दाखवण्याचं बंद केले तर हे बंद होईल. राजकारण्यांना खडे बोल सुनावण्याचं काम साहित्यिकांनी करावे असंही राज ठाकरेंनी सांगितले. त्याशिवाय संजय नाहर यांचं माझ्या वडिलांवर प्रचंड प्रेम, बहुदा त्यामुळेच माझ्यावरही असेल. संजय नाहर हा चळवळीतला माणूस, त्यातून काश्मीरपासून त्यांची संस्था कार्यरत आहे. या ऐतिहासिक वास्तूत मला बोलावलं त्याबद्दल मी आभार मानतो असं राज पुढे म्हणाले.