Maharashtra Politics ( Marathi News ) : मुंबई : विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीत राज्यातून २४ महिला विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. याचा अर्थ २८८ पैकी केवळ सात टक्के महिला आमदार होत्या. त्यातील निम्म्या म्हणजे १२ महिला आमदार भाजपच्या तर पाच काँग्रेसच्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन, शिवसेनेच्या दोन तर दोन अपक्ष महिला उमेदवारांनी त्यावेळी निवडणूक जिंकत विधानसभा गाठली होती.
लोकसभा, विधानसभेच्या २०२९ मधील निवडणुकीत महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण असणार आहे, असे मानले जात आहे. त्यावेळी राज्यातून तब्बल ९५ महिलांना आमदारकी मिळेल. मात्र, पूर्वेतिहास बघता यावेळच्या विधानसभा निवडणुकीतही महिलांवर मुख्य राजकीय पक्षांकडून अन्यायच होण्याची शक्यता आहे.
खून केला पुण्यात, दोघांच्या हातात कल्याण येथे पडल्या बेड्या; २० मिनिटांतच ताब्यात घेतले
२०१९ मध्ये या महिला झाल्या होत्या विजयी
भाजप - १) सीमा हिरे (नाशिक पश्चिम), २) विद्या ठाकूर (गोरेगाव), ३) भारती लव्हेकर (वर्सोवा), ४) मुक्ता टिळक (कसबा पेठ), ५) मंदा म्हात्रे (बेलापूर), ६) माधुरी मिसाळ (पर्वती, पुणे), ७) देवयानी फरांदे (नाशिक मध्य), ८) मोनिका राजळे (शेवगाव), ९) श्वेता महाले (चिखली), १०) नमिता मुंदडा (केज), ११) मेघना बोर्डीकर (जिंतूर), १२) मनीषा चौधरी (दहीसर).
काँग्रेस - १) यशोमती ठाकूर (तिवसा), २) वर्षा गायकवाड (धारावी), ३) प्रणिती शिंदे (सोलापूर मध्य), ४) सुलभा खोडके (अमरावती), ५) प्रतिभा धानोरकर (वरोरा).
राष्ट्रवादी - सुमनताई पाटील (तासगाव), २) अदिती तटकरे (श्रीवर्धन), ३) सरोज अहिरे (देवळाली).
शिवसेना - १) लता सोनवणे (चोपडा), २) यामिनी जाधव (भायखळा).
अपक्ष - १) गीता जैन (मीरा भाईंदर), २) मंजुळा गावित (साक्री).
केवळ सात टक्केच महिला विधानसभेत असणे हे पुरोगामी महाराष्ट्राला भूषणावह नाही. महिलांना संधी दिली तर त्या संधीचे सोने करतात हे आतापर्यंत अनेकवेळा सिद्ध झाले आहे. निवडून येण्याची क्षमता असलेल्या महिलांना डावलणे हे अन्यायकारक असेल.
- खा. वर्षा गायकवाड, अध्यक्ष मुंबई काँग्रेस
राजकीय घराण्यांशी संबंध असलेल्या महिलांऐवजी पक्षासाठी वर्षानुवर्षे कार्यरत असलेल्या महिलांना उमेदवारीबाबत प्राधान्य दिले पाहिजे. लोकसभा, विधानसभाच नाही, तर राज्यसभा, विधान परिषदेतही महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण असायला हवे.
- डॉ. नीलम गोऱ्हे उपसभापती विधान परिषद
या आमदार महिला लोकसभा जिंकल्या
आमदार महिलांपैकी वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे आणि प्रतिभा धानोरकर चालू वर्षी लोकसभा निवडणुकीत जिंकल्या. यामिनी जाधव यांनी शिंदेसेनेतर्फे दक्षिण मुंबईतून निवडणूक लढविली; पण त्यांचा पराभव झाला. २०१९ मध्ये २४ महिला आमदार झाल्या. तरीही हा आकडा आजवरचा सर्वाधिक आहे.
महिलांना मिळालेली संधी
१९६२ १०
१९६७ ९
१९७२ ५
१९७८ ८
१९८० १९
१९८५ १६
१९९० ६
१९९५ ११
१९९९ १२
२००४ १२
२००९ ११
२०१४ २०
२०१९ २४
एकूण - १६३
(यात पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या महिलांची संख्या समाविष्ट नाही.)