CM Eknath Shinde on Uddhav Thackeray : शिवसेनेच्या फाटाफुटीनंतर दोन्ही पक्षाचे प्रमुख एकमेकांना लक्ष्य करत आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गटातील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाच्या नेत्यांनी माध्यमांना मुलाखती देऊन धक्कादायक खुलासे केले आहेत. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना भाजपसोबत जाण्यासाठी आपण उद्धव ठाकरेंना बोललो होतो असा दावा केला. मात्र उद्धव ठाकरेंमध्ये मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा होती, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
२०१९ मध्ये सत्तावाटपाच्या वादावरुन निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची युती तोडून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्यावेळी उद्धव ठाकरे हे स्वतः मुख्यमंत्री झाले होते. मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी आमची साथ सोडल्याचा आरोप भाजपने केला होता. त्याबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी लोकसत्ता दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंना मी पाच वेळा बोललो, भाजपसोबत युती करा, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच बाळासाहेबांनी उद्धव यांना मुख्यमंत्री केलेच नसते, असेही शिंदे यांनी म्हटलं आहे.
"मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा उद्धव ठाकरे यांच्या मनात पूर्वीपासूनच होती. भाजपसोबत राहिलो तर कधीच मुख्यमंत्री होता येणार नाही, हे उद्धव ठाकरेंना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी शरद पवारांकडे निरोप पाठवला. ते आज म्हणतात की, त्यांना मुख्यमंत्री व्हायचे नव्हते. हे साफ खोट आहे. शिवसेनाप्रमुखांना कधीच सत्तेची लालसा नव्हती. त्यांना सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा असे वाटायचे. शिवसेनाप्रमुखांनी उद्धव ठाकरेंना कधीच मुख्यमंत्री केले नसते", असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच भाजपसोबत युती करा, असे मी किमान पाच वेळ तरी त्यांना बोललो होते. त्यांना ते मान्य नव्हते, कारण मुख्यमंत्री पदावर त्यांचा डोळा होता, असा दावाही शिंदेंनी केला आहे.
"शरद पवार काहीही म्हणोत उद्धव ठाकरे यांनी त्यांचा पक्ष आधीच काँग्रेसपुढे लीन केला आहे. उद्धव काँग्रससमोर लीन झाले आहेतच; लवकर विलीनही होतील," असेही एकनाथ शिंदे म्हणाले.