"नवाब'चा 'जवाब' द्या किंवा नका देऊ पण...", 'मनसे'चा राज्य सरकारला गंभीर इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 08:09 PM2023-12-08T20:09:56+5:302023-12-08T20:10:38+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्यावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.
मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्यावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून घेतलेल्या जाहीर भूमिकेमुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांना महायुतीपासून दूर ठेवावं, अशी विनंती करणारं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना लिहिलं आणि हे पत्र सार्वजनिकही केलं. याचाच दाखला देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्य सरकारला फटकारलं आहे.
मनसे अधिकृत या सोशल मॅडिया प्लॅटफॉर्मवरून एक फोटो शेअर करत 'मनसे'नं सरकारला इशारा दिला. मनसेनं शेअर केलेल्या फोटोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्हीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, तसेच मंत्री छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल दिसत आहेत. "इतका स्नेह संबंध आहे तर पत्र का लिहावं लागतं? सुहास्य वदन दाखवण्याची ही कोणती धडपड? 'नवाब'चा 'जवाब' द्या किंवा नका देऊ पण तुम्ही घातलेल्या राजकीय ढोंगीपणाच्या 'नकाब'चा 'जवाब' मात्र तुम्हाला जनतेला द्यावाच लागेल नाहीतर जनता अगदी योग्यवेळी त्यांना गृहीत धरणाऱ्यांना धडा शिकवेल", अशा शब्दांत मनसेनं सरकारला इशारा दिला.
इतका स्नेह संबंध आहे तर पत्र का लिहावं लागतं ? सुहास्य वदन दाखवण्याची ही कोणती धडपड ?
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) December 8, 2023
'नवाब'चा 'जवाब' द्या कि नका देऊ पण तुम्ही घातलेल्या राजकीय ढोंगीपणाच्या 'नकाब'चा 'जवाब' मात्र तुम्हाला जनतेला द्यावाच लागेल नाहीतर जनता अगदी योग्यवेळी त्यांना गृहीत धरणाऱ्यांना धडा शिकवेल ! pic.twitter.com/bee7Omzc4p
अजित पवार काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीसांच्या पत्राबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं पत्र मला मिळालं असून मी ते पत्र वाचलं आहे. २ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. या सर्व घडामोडीनंतर नवाब मलिक हे कालच पहिल्यांदा सभागृहात आले आणि ते कुठे बसले हे सर्वांना माहीत आहे. मात्र त्यांनी स्पष्टपणे या सगळ्या घडामोडींबाबत भूमिका मांडलेली नाही. मलिक यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर मी कालच्या पत्राबद्दल भूमिका मांडणार आहे," असं अजित पवारांनी म्हटलं आहे. यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नावर बोलताना अजित पवार काहीसे चिडलेले पाहायला मिळाले.
दरम्यान, "नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असं आमचं स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे. हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो," असं म्हणत नवाब मलिकांना महायुतीपासून दूर ठेवा, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.