‘महाविकास’च्या जागावाटप चर्चेला सुरुवात; चर्चा सलग तीन दिवस सुरू राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 10:39 AM2024-09-19T10:39:57+5:302024-09-19T10:50:20+5:30
प्रत्येक विभागात सध्या कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला कोणत्या विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली होती.
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जागा वाटपाच्या चर्चेला बुधवारी सुरुवात केली. तीनही पक्षांनी विभागवार आपले अहवाल बैठकीत मांडले. ही चर्चा सलग तीन दिवस सुरू राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रत्येक विभागात सध्या कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला कोणत्या विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली होती. तसेच प्रत्येक मतदारसंघात तीन प्रमुख पक्षांकडून इच्छुक उमेदवार कोण आहेत यावर बैठकीत प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते. कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाची ताकद जास्त आहे, तसेच कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो हा निकष समोर ठेवून जागा वाटप करण्यावर या बैठकीत चर्चा झाली. काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शरद पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड तर उद्धव सेनेकडून नेते संजय राऊत आणि अनिल देसाई उपस्थित होते.
मुंबईतील तिढा लवकर सोडवणार
मुंबईतील ३६ जागांबाबत यापूर्वी महाविकास आघाडीच्या तीनही प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या बैठका पार पडल्या आहेत. ३६ पैकी ६ ते ७ जागांवर काँग्रेस आणि उद्धव सेनेत तिढा कायम आहे. मुंबईतील हा तिढा लवकर सोडवून ३६ जागांचे वाटप पूर्ण करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.