Sanjay Gaikwad ( Marathi News ) : काल शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची गाडी एक पोलिस अधिकारी साफ करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे आता पोलीस कर्मचारी हे संरक्षणासाठी असतात की आमदारांची गाडी धुण्यासाठी असा सवाल आता विचारला जात आहे. या प्रकरणावरुन त्यांच्यावर राजकीय वर्तुळात आरोप करण्यात आले होते. दरम्यान, आता या प्रकरणावर आमदार संजय गायडकवाड यांनी त्यांची बाजू मांडली आहे.
"पोलिस अधिकारी गाडी साफ करत असताना त्यांना दिसलं आहे, पण त्यांनी असं का केलं हे जाणण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. आज सकाळी पहाटे महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे येणार होते. मला सकाळी ५ वाजता फोन आला की, सिल्लोड जवळ गाडीला प्रोब्लेम आल्याचे त्यांनी सांगितलं. पहाटे मी एकटा गेलो आणि पुतळे सगळे आणले. त्यानंतर सकाळी पोलिस अधिकारी मुळे ड्युटीवर आले. ते रात्री उशीरा आले होते कारण त्यांची रात्री तारीख होती, त्यांनी त्यावेळी नाश्ता केला. मी त्यांना त्यावेळी असलं काही खात जाऊ नका असं सांगितलं होतं. यानंतर पुढे गेल्यानंतर त्यांनी गाडीमध्ये उलटी केली. यानंतर आम्ही परत ऑफिसला आलो. यावेळी ड्रायव्हरचा आणि त्यांचा वाद झाला. यावेळी ड्राव्हरने त्यांनाच गाडी साफ करायला सांगितलं. म्हणून त्यांनी तेवढ साफ केलं आहे. पोलिसांनी कर्मचारी म्हणून गाडी धुतलेली नाही. त्यामुळे त्यांना गाडी पुसायला लावलं असलं काही नाही, असं स्पष्टीकरण आमदार संजय गायकवाड यांनी दिलं.
"आम्ही पोलिसांना सन्मानाने वागवतो, आम्हालाही कायदे काय आहेत माहिती आहेत. गाडी पुसायला आमच्याकडे माणस नाहीत असं काही नाही. विरोधक उठसुठ सरकारवर आरोप करत आहेत, त्यांना काही काम नाही, असा टोलाही आमदार गायकवाड यांनी लगावला.
काँग्रेस नेत्याने समोर आणला व्हिडीओ
आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आता पोलीस कर्मचारी हे संरक्षणासाठी असतात की आमदारांची गाडी धुण्यासाठी असा सवाल आता विचारला जात आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्याशी संबधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सकपाळ यांनी हा व्हिडीओ त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर एक पोलीस कर्मचारी त्यांची गाडी पाण्याने धूत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमुळे संजय गायकवाड यांच्यासह पोलीस प्रशासनावरही टीका करण्यात येत आहे.