Maharashtra Politics: काही दिवसांपूर्वीच राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीतील अजित पवार समर्थक आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. पवारांसह नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पण, त्यांचे खातेवाटप जाहीर झाले नव्हते. आज अखेर खातेवाटव जाहीर झाले. यात भाजप नेते अतुल सावे आणि शिवसेना(शिंदे गट) नेते दादा भुसे यांना प्रमोशन मिळाले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाचा निर्णय आज झाला. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. या खाटेवाटपातत नवीन मंत्र्यांच्या खात्यासोबतच काही विद्यमान मंत्र्यांचेही खाते बदलण्यात आले. यात काही नेत्यांना प्रमोशन म्हणजेच चांगली/वजनदार खाते देण्यात आले, तर काही नेत्यांकडील वजनदार खाते काढून घेण्यात आले.
कोणाला कोणते खाते मिळाले, जाणून घ्या- शिंदे सरकारचे खातेवाटप अखेर जाहीर
दरमयान, भाजप नेते अतुल सावे यांना या खातेवाटपात प्रमोशन मिळाले आहे. अतुल सावे यांच्याकडे पूर्वी सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे जबाबदारी होती. आता त्यांना इतर मागास व बहुजन कल्याणसोबतच गृहनिर्माण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडील सहकार खाते दिलीप वळसे-पाटील यांना देण्यात आले आहे.
याशिवाय, शिंदे गटातील नेते दादा भुसे यांनाही या खातेवाटपात वजनदार खाते मिळाले आहे. पूर्वी त्यांच्याकडे बंदरे आणि खाणकाम मंत्रालयाची जबाबदारी होती. आता त्यांना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडील बंदरे आणि खाणकाम मंत्रालय संजय बनसोडे यांना देण्यात आले आहे.