Sanjay Raut On Narendra Modi : राज्यात एकाकीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी उडत असताना दुसरीकडे नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या बड्या नेत्यांच्या मुलाखतींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदेंना सोबत न घेता तुम्ही मुख्यमंत्री बना असे उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यानतंर आता एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाहीत, असं विधान केलं आहे. त्यावर आता प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी निवडणूक हरतायत म्हणून हे सगळं बोलत आहेत असं म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असतानाच पंतप्रधान मोदींनी दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्याबाबत अनेक महत्त्वाची विधानं केली आहेत. टीव्ही९ मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत. त्यांच्यावर कुठलंही संकट आलं तरी मदतीसाठी धावणारा मी पहिला व्यक्ती असेन, असे म्हटलं आहे. तसेच शरद पवारांना या वयात कुटुंब सांभाळता आलं नाही असं मोदी यांनी म्हटलं आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी खोटं बोलतात, असे प्रत्युत्तर दिलं आहे.
नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्रात अडचणी निर्माण केल्या
"नरेंद्र मोदी खोटं बोलतात. नरेंद्र मोदी हे स्वतः अडचणीत आहेत. अडचणीत असलेला व्यापारी हा आपल्या फायद्यासाठी खोटं बोलतो, असं चाणक्यने सांगितले आहे. मोदींना चाण्यकाचे फार वेड आहे. नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्रात आणि शिवसेनेत अडचणी निर्माण केल्या. त्यांना एवढा जर प्रेमाना पान्हा फुटला असता तर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तोडली नसती. बाळासाहेबांच्या शिवसेनेचं नाव एका बेमान माणसाला देण्याचं कृत्य केलं नसतं. बाळासाहेब ठाकरेंचा धनुष्यबाण एका बेमान माणसाच्या हातात ठेवला नसता. तेव्हा आता त्याचे उफाळून आलेलं प्रेम हे खोटं आहे. मोदींनी दरवाजे उघडले तरी त्याच्या समोर उभं राहणार नाही. स्वाभिमान नावाची गोष्ट या महाराष्ट्रात शिल्लक आहे. तसेच याचा अर्थ असाही आहे की नरेंद्र मोदी निवडणूक हरतायत. त्यांना बहुमत मिळत नाहीये म्हणून ते हे दरवाजे, फटी, खिडक्या उघडायच्या मागे लागले आहेत," असं संजय राऊत म्हणाले.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
"उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत. ते जेव्हा आजारी होते तेव्हा मी त्यांना फोन केला होता. रश्मी वहिनींना रोज फोन करुन मी उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीची विचारपूस करायचो. तसंच ऑपरेशन करण्यापूर्वी त्यांनी मला फोन केला होता. आपका क्या विचार है? असं मला विचारलं होतं मी त्यांना हे सांगितलं की तुम्ही ऑपरेशन करा, बाकीची चिंता सोडा. शरीराकडे लक्ष द्या. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी त्यांचा मान सन्मान करणारच. उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. त्यांच्यावर जर कुठलं संकट उद्या आलं तर मदतीसाठी धावणारा मी पहिला व्यक्ती असेन. मात्र बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडल," असं मोदींनी मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.
शिंदेंना मुख्यमंत्री करुन बाळासाहेबांना आदरांजली दिली - मोदी
"बाळासाहेब ठाकरेंचं माझ्यावर खूप प्रेम होतं. त्यांची आपुलकी, प्रेम हे मी कधीही विसरु शकणार नाही. आजच्या घडीला महाराष्ट्रात आमचे सर्वाधिक आमदार आहेत. तरीही शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देऊन आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं. मी ही बाळासाहेब ठाकरेंना वाहिलेली आदरांजली आहे. बाळासाहेब ठाकरेंवर माझी खूप श्रद्धा आहे, मी त्यांचा आदर आजही करतो आणि यापुढे आयुष्यभर करत राहिन," असंही मोदी म्हणाले.