Sharad Pawar on Narendra Modi Offer : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत देशाच्या राजकारणातील नेते शरद पवार यांनी एका मुलाखतीमध्ये मोठं विधान केलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील किंवा काही काँग्रेसमध्ये विलीनही होतील, असे शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्यामुळे शरद पवार यांच्यासोबत उद्धव ठाकरेंचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मोठी ऑफर दिली आहे. काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसोबत यावं, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. यावर आता शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नंदुरबारच्या भाजपच्या उमेदवार हिना गावीत यांच्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना ऑफर दिली आहे. नरेंद्र मोदी यांच्या ऑफरनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झालीय. शरद पवारांनी छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असं विधान केल्यानतंर मोदींनी त्यांना ही ऑफर दिली. त्यावर मात्र शरद पवार यांनी पत्रकार परिषदेतून आपली भूमिका स्पष्ट केली.
शरद पवारांनी अजित पवारांसोबत यावं - नरेंद्र मोदी
"महाराष्ट्राचे एक दिग्गज नेते ४० वर्षांपासून फिरत आहेत. बारामतीच्या निवडणुकीनंतर ते खूप चिंतेत आहेत. त्यांनी एक विधान केलं आहे जे मला वाटतं त्यांनी अनेकांसोबत चर्चा करुन केलं असेल. ते इतके हताश आणि निराश झालेत की त्यांना वाटतंय ४ जूनच्या नंतर राजकारणात टिकून राहायचं असेल तर छोट्या राजकीय पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हायला हवं. याचा अर्थ असा की जी नकली राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. ४ जूननंतर काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा छातीठोकपणे अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसोबत या. मोठ्या अभिमानाने स्वप्ने साकार होतील," असं नरेंद्र मोदी म्हणाले.
काय म्हणाले शरद पवार?
"मोदी पुन्हा महाराष्ट्रात आलेत का. माझे व्यक्तिगत संबंध वेगळे आणि धोरणात्मक संबंध वेगळे. आज या देशामध्ये संसदीय लोकशाही पद्धती मोदींमुळे संकटात आली,असं माझं मत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक करुन तुरुंगात टाकण्याची भूमिका घेतली. याच्या पाठीमागे केंद्र सरकारचा सहभाग असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. याच्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की लोकशाही पद्धतीवर कोणाचा किती विश्वास आहे. ज्या व्यक्तीचा, पक्षाचा आणि विचारधारेचा संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वास नाही असा समज लोकांमध्ये पक्का असेल त्यांच्यासोबत सहकार्य व्यक्तिगतरित्या सोडा राजकारणात कधीही होणार नाही," असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
एखाद्या समाजाला बाजूला ठेवून पुढे जाता येणार नाही - शरद पवार
“गांधी-नेहरूंची विचारधारा आम्हाला प्रिय आहे. ती सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणात मुस्लीम समाजाबद्दल काहीतरी भाष्य केल्याचे आम्ही ऐकले. हा देश पुढे घेऊन जायचा असेल तर सर्वधर्मीयांना एकत्र घेऊन जावेच लागेल. एखाद्या समाजाला बाजूला ठेवून पुढे जाता येणार नाही. पंतप्रधान मोदी अलीकडे वारंवार एका धर्माच्या विरोधात भूमिका मांडत आहेत, अशी भूमिका मांडणाऱ्यांच्या बरोबर आम्ही कधीही जाणार नाही," असंही शरद पवार म्हणाले.