Narayan Rane on Sharad Pawar : पुण्यातल्या सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र एका भटकत्या आत्म्याचा शिकार झाले आहे. त्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र अस्थिर झाला आहे अशी टीका केली होती. पंतप्रधान मोदी यांनी ही टीका शरद पवार यांच्यावर त्यांचा नामोल्लेख टाळत केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. शरद पवार गटाने देखील मोदींनी शरद पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणणे पटते का असा सवाल केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना शरद पवार यांनी हो, मी शेतकरी आणि कामगारांसाठी अस्वस्थ आहे, असं म्हटलं होतं. या अतृप्त आत्माच्या वादात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडी घेतली आहे.
मोदींचे वाक्य काही जणांना लागलं - नारायण राणे
शरद पवार एखाद्या विषयासाठी अस्वस्थ झाले असते तर ८४ वर्षे जगले नसते, असं विधान नारायण राणे यांनी केलं आहे. एका प्रचार सभेत बोलताना त्यांनी हे विधान केलं. " पंतप्रधान मोदी एक वाक्य बोलले इस महाराष्ट्र में अस्वस्थ नेताजन है, खाली भटक रहा है उनका आत्मा', हे मोदीजींचं वाक्य. काही जणांना लागलं. मोदींनी तर नाव घेतलं नाही. त्यानंतर एक व्यक्ती असं म्हणाले की, 'महागाईसाठी लोक त्रस्त आहे. महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी अस्वस्थ आहे. पवार साहेब कधीपासून हो?" असा सवाल नारायण राणे यांनी विचारला.
"कशामुळे अस्वस्थ? एवढी जनतेची आस्था प्रेम आहे. किती वर्षे सत्तेवर होतात. केंद्रात १२ वर्षे मंत्री होतात. मोदींनी सांगितलं भारताला महासत्ता बनवेन. देशाला तिसऱ्या क्रमांकावर आणेन. मोदी कर्तबगारी सिद्ध करताहेत. अमेरिका, इटली, इस्रायल अशा भल्याभल्या देशाच्या अध्यक्षांनी मोदींचं कौतुक केलं. प्रशासन हाताळण्याची त्यांची क्षमता. कर्तृत्वान पुरुष म्हणून देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारे आहेत," असेही नारायण राणे म्हणाले.
शरद पवार बिंनधास्त असतात
"शरद पवार आयुष्यात एखाद्या विषयासाठी अस्वस्थ झाले असते तर ८४ वर्षे जगले नसते. माणसाला आजकाल हवामानामुळे अस्वस्थ झाल्यावर ५०-५५ वर्षात अटॅक येतो. माणसं जातात. वादळ येवो, पूर येवो, जग इकडचे तिकडे होवो ८४ व्या वर्षात शरद पवार यांना काही होत नाही. बिनधास्त असतात. मोदी साहेबांना उकसवतात. तुमचं सरकार गेल्याशिवाय माझी अस्वस्थता जात नाही. आमचं सरकार जाणार नाही. ४०० खासदार निवडूण येवून मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार," असं नारायण राणे म्हणाले.