"खिशात ७० रुपये असताना..."; मी नवखा नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 10:53 AM2024-06-29T10:53:48+5:302024-06-29T10:55:01+5:30

Sharad Pawar : राज्याच्या अर्थसंकल्पावर शरद पवार यांनी भाष्य करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे.

Maharashtra Politics Sharad Pawar reacted on the Maharashtra state budget 2024 | "खिशात ७० रुपये असताना..."; मी नवखा नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांचे प्रत्युत्तर

"खिशात ७० रुपये असताना..."; मी नवखा नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांचे प्रत्युत्तर

Sharad Pawar on Maharashtra Budget : राज्य सरकारने शुक्रवारी आपला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. शेतकरी, महिला यासह युवकांसाठी अर्थसंकल्पातून महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकील डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडल्याची टीका विरोधकांनी केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनीही पत्रकार परिषद घेत अर्थसंकल्पावर भाष्य केलं आहे. यासोबत अजित पवारांनी विरोधकांवर केलेल्या टीकेलाही शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं.

कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत अर्थसंकल्पावर आणि आगामी विधानसभा निवडणुकांवर भाष्य केले. या अर्थसंकल्पाची गुप्तता पाळली गेली नाही आणि तो फुटला होता असा दावा शरद पवार यांनी केला. अर्थसंकल्पसंदर्भातली माहिती आधी बाहेर येता कामा नये. कारण त्याला अर्थसंकल्प फुटला असं म्हणतात. काल अर्थसंकल्प मांडण्यात आला. पण त्याच्या आदल्या दिवशीच्या वर्तमानपत्रांत अर्थसंकल्पात काय काय येणार आहे, ते छापून आलं होतं. अनेक गोष्टी विधानभवनात मांडण्यापूर्वीच बाहेर आल्या होत्या. याचा अर्थ स्पष्ट आहे की अर्थसंकल्पाची गुप्तता पाळली गेली नाही, असे शरद पवार म्हणाले.

दुसरीकडे, विरोधकांनी अर्थसंक्लपावर टीका केल्यानंतर अजित पवारांनी भाष्य केलं होतं. “मी काही आज अर्थसंकल्प सादर करत नाहीये. या सगळ्या गोष्टींमध्ये मी नवखा नाही. यावेळी मी दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडला आहे," असं विधान अजित पवार यांनी केलं होतं. माध्यमांनी शरद पवार यांच्याकडे अजित पवारांच्या ‘मी काही नवखा नाही’ विधानाबाबत विचारलं असता त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

"एखाद्या गोष्टीवर मी १०० रुपये खर्च करणार म्हटलो आणि माझ्या खिशात ७० रुपये आहेत, तर मग मी १०० रुपये खर्च कसे करणार? पहिला प्रश्न हा आहे की तुमच्याकडे महसुली जमा किती आहे? दुसरं महसुली खर्च किती होणार आहे? आणि जमेपेक्षा खर्चाची रक्कम अधिक असताना खर्चाचा फरक कसा भरणार? याची तरतूद न करता खर्च करणार म्हटलं आणि विचारपूर्वक केलं असं म्हटलं तरी त्याला फारसा काही अर्थ राहात नाही," असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला.
 

Web Title: Maharashtra Politics Sharad Pawar reacted on the Maharashtra state budget 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.