"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 11:49 AM2024-05-04T11:49:38+5:302024-05-04T12:23:26+5:30
Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे.
Sharad Pawar on Narendra Modi : बारामतीतल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्या लढाईत संपूर्ण पवार कुटुंब मैदानात उतरलं आहे. या निवडणुकीमुळे पवार कुटुंबियांमध्येच आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. अशातच आता कुटुंब सांभाळता आलं नाही महाराष्ट्र काय सांभाळणार अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं, असा घणाघात शरद पवार यांनी केलाय. तसेच मोदी डॉ. मनमोहन सिंग यांचेच निर्णय राबवत आहेत असाही दावा शरद पवार यांनी केलाय.
टीका-टिप्पणीतच मोदींचा वेळ जातो - शरद पवार
"पंतप्रधान मोदी यांनी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. पण त्या अमलात आलेल्या नाहीत. त्यांचा स्वभाव हा बेछुटपणाने बोलायचा आहे. ते झेपणार आहे की नाही, सरकारची आजची स्थिती आहे की नाही याचा यत्किचिंतही विचार ते करत नाहीत, म्हणून पंतप्रधान मोदींबद्दलची आस्था कमी होत आहे. विशेषतः २०१४ मध्ये त्यांनी जनतेच्या समोर अनेक गोष्टी मांडल्या. त्यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांच्या धोरणांवर मोदींनी टीका-टिप्पणी केली होती. पण आज तेच निर्णय मोदी राबवत आहेत. त्यांचातला हा विरोधाभास लोकांना दिसत आहे. लोक आता डॉ. मनमोहन सिंग यांची दहा वर्ष आणि मोदींच्या दहा वर्षांची तुलना करत आहेत. डॉ. मनमोहन सिंग यांचं वैशिष्ट होतं की, ते कोणताही गाजावाजा न करता शांतपणे काम करायचे आणि रिझल्ट द्यायचे. मोदी साहेबांचा रिझल्ट माहीत नाही, पण टीका-टिप्पणीतच त्यांचा फार वेळ जातो. लोकांना आता हे सर्व कळायला लागले आहे, ” असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार महाराष्ट्र काय सांभाळणार, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. मोदींच्या या टीकेला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. "मलाही मोदींबद्दल माहिती आहे. त्यांनीही कुठे कुटुंब सांभाळले? पण मी त्या स्तरावर जाऊ इच्छित नाही. त्यांची कौटुंबिक परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. पण असं व्यक्तिगत बोलू नये. हे पथ्य पंतप्रधानांनी पाळले नाही. पण मीही हे पथ्य पाळू नये ही भूमिका काही योग्य होणार नाही,” असं प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिलयं.
"सध्या माझं लक्ष दहा जागांवर आहे ज्या आमच्या पक्षाच्या वतीने लढवण्यात येत आहे. या दहा जागांचे काम संपलं त्यानंतर बाहेर जाता येईल. पण ट्रेन्ड अनुकूल दिसत आहे. पाच वर्षापूर्वी काँग्रेसला एक आणि आम्हाला पाच जागा मिळाल्या होत्या. यावेळी मला वाटतं की, काँग्रेसला दहा बारा आणि आम्हाला आठ नऊ जागा मिळू शकतात," असंही शरद पवार म्हणाले.
काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?
"शरदरावांसंदर्भात बोलायचं झाल्यास त्यांची समस्या ही राजकीय नाही. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला हे कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी लोकांना ते कसं पटणार? ही पूर्णपणे त्यांची कौटुंबिक समस्या आहे. हा पूर्णपणे त्यांच्या घरातील वाद आहे. काम करणाऱ्या पुतण्याला वारसा द्यायचा की मुलीला? त्यामुळे सहानुभूतीऐवजी असा प्रश्न पडतो की जे या वयात कुटुंबाला सांभाळू शकत नाही ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?" असा टोला मोदींनी लगावला होता.