Maharashtra Politics: आज महाराष्ट्रातील नागरिकांना पुन्हा एकदा मोठे सत्तानाट्य पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार बंडखोरी करत आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर इतर आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत बंडखोरांवर जोरदार टीका केली.
पाटील म्हणतात, 'आज तुम्ही जे पाहिलं तेच आम्ही पाहिलं. शरद पवार यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही सर्वजण शरद पवार यांच्यासोबत आहोत. आज शपथविधीला ज्यांना बोलावण्यात आले होते, त्यांना कशावर सह्या घेतल्या माहिती नव्हती. तिथे होते ते आमदार शरद पवारांसोबत बोलले आहेत. काही जण माझ्यासोबत बोलले आहेत. काही आमदार संभ्रमात होते मात्र आता स्पष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते झालेल्या घटनेचा निषेध करत आहेत. महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते शरद पवारांसोबत आहेत,' असं जयंत पाटील म्हणाले.
ते पुढे म्हणतात, 'आजच्या कृतीला शरद पवार साहेबांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही. 5 तारखेला राष्ट्रवादी पक्षाचे राज्यस्तरावरचे, जिल्हा स्तरावरचे, तालुका प्रतिनिधी या सर्वांना दुपारी 1 वाजता राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी बोलावलं आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरला या बैठकीचं आयोजन केले आहे. या बैठकीत शरद पवार आपली भूमिका अधिक स्पष्ट करतील,' असंही पाटील म्हणाले.
'ज्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यांना बरीच मोठी आश्वासने देण्यात आली आहेत. ही आश्वासने नेमकी काय आहेत, हे योग्य वेळी सांगू. आठ जणांची काही वेगळी भूमिका होती, ते सतत मांडत होते. ईडी चौकशी दरम्यान, मला निरोप आला का? तो विषय वेगळा आहे, मी नंतर त्यावर भाष्य करणार आहे.' बंडखोरांवर कारवाई करण्याबाबत जयंत पाटील यांनी म्हटले की, 'दुपारच्या घटनाक्रमानंतर कायदेशीर बाबींवर विचार करण्यास संधी मिळाली नाही. कारवाई संदर्भात कायदेशीर सल्ला घेऊ पुढील निर्णय घेऊ.'
ते पुढे म्हणाले की, 'राज्यात आणखी एक पक्ष फोडण्याचे काम भाजपने केले आहे. सत्तेत असताना आणि बहुमताची गरज नसतानाही विरोधी पक्ष फोडला. आधी शिवसेना फोडली, त्यांचा लढा सुप्रिम कोर्टात गेला. कोर्टाने काय निर्णय दिला ते सर्वांना माहित आहे. राज्यात पुन्हा असं घडेल असं वाटल नव्हत. देशात नऊ राज्य आहेत, जिथे विरोधी पक्ष फोडण्याचे काम होत आहे. विरोधकांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. ऑपरेशन लोटस हे भाजपचे चिन्ह आहे,' अशी टीकाही त्यांनी केली.