Maharashtra Politics ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारू सुरू केली आहे. काल केंद्रीय मंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते, यावेळी त्यांनी जागावाटपावर बैठका घेतल्या. यावेळी एका सभेत बोलताना त्यांनी खासदार शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. 'आपलं लक्ष शरद पवार ( Sharad Pawar ), उद्धव ठाकरे यांना रोखणं आहे', अशी टीका शाह यांनी केली होती. दरम्यान, आता या टीकेला आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून देण्यात आले आहे.
सदोष वेल्डिंग, कमकुवत ढाचामुळे कोसळला पुतळा; चौकशी समितीच्या अहवालात निष्कर्ष
"महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी व मराठी माणसाला कंगाल करण्यासाठी अमित शहा यांना शरद पवार व उद्धव ठाकरे यांना राजकीयदृष्ट्या खतम करायचे डोहाळे लागले आहेत. हे डोहाळे त्यांच्यावरच उलटतील. अमित शहांचे ( Amit Shah ) हे डोहाळे जेवण लाचार स्वाभिमानशून्य मिंधे टोळी करत आहे व त्यांना नाशकात हे डोहाळे लागले",अशी टीका या लेखातून केली आहे.
"नाशकात श्राद्ध, अंत्यसंस्कार, नारायण नागबळी यासारखे विधी केले जातात. शिवसेना वगैरे फोडण्याचे डोहाळे ज्यांना लागले आहेत त्यांचे क्रियाकर्म नाशकातील रामकुंडावरच करण्याचा निर्धार मऱ्हाटी जनतेने केला आहे. उद्धव ठाकरे व शरद पवारांचे पक्ष खतम करण्याविषयी जे बोलतात त्यांनाच नीट फोडून झोडले जाईल. महाराष्ट्रात सगळ्याच माजोरड्यांचा माज उतरवून मिळतो", असंही या लेखात म्हटले आहे.
'पराभवाच्या भीतीने भाजपचे हातपाय थरथरू लागले'
सामनातून केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा झालेल्या दौऱ्यावर टीका केली आहे. या लेखात पुढे म्हटले आहे की, "या देशाचे पंतप्रधान सन्माननीय पंतप्रधानांसारखे वागत नाहीत. देशाचे गृहमंत्री शहा हेदेखील गृहमंत्रीपदाला साजेसे वागत नाहीत. देशाचे सरन्यायाधीश पदाचा आब राखत नाहीत. अशी विचित्र परिस्थिती देशात निर्माण झाली आहे. देशाचे व राज्याचे गृहमंत्रीच स्वतः कायदा धाब्यावर बसवत आहेत व त्यांच्या कार्यकर्त्यांना कायदा मोडण्यासाठी प्रेरणा देत आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी नाशकातील त्यांच्या दौऱ्यात भाजप पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला की, ‘‘फोडा, झोडा; पण निवडणुका जिंका.’’ महाराष्ट्रात पराभवाच्या भीतीने भाजपचे हातपाय थरथरू लागले आहेत व स्वतः गृहमंत्री शहादेखील महाराष्ट्र हातचा जातोय या भयाने खचले आहेत, असा टोलाही लगावला आहे. ( Maharashtra Politics )