"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 10:34 AM2024-10-03T10:34:33+5:302024-10-03T10:36:07+5:30
Maharashtra Politics : राज्यात विधानसभा निवडणुकांची काही दिवसात घोषणा होणार असून सर्वच पक्षांनी तयारी सुरू आहे.
Maharashtra Politics ( Marathi News ) : राज्यात विधानसभा निवडणुकांची काही दिवसात घोषणा होणार असून सर्वच पक्षांनी तयारी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, काल उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या भाषणात ते महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करत असल्याचे समोर आले आहे. या विधानावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
"लग्नाला पोरगी पाहिजे असेल, तर पोरगा नोकरीवाला पाहिजे. पोरगी स्मार्ट हवी असेल, तर ती तुमच्या माझ्यासारख्या पोरांना भेटत नाही, नोकरीवाल्यांना भेटते. दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते, ज्यांचा पानठेला आहे, धंदा किराणा दुकान आहे, अशा माणसांना दोन नंबरची पोरगी भेटते आणि तीन नंबरचा गाळ राहिलेली पोरगी शेतकऱ्यांच्या पोरांना भेटते. शेतकऱ्यांच्या पोरांचं काही खरं राहिले नाही, अशा वादग्रस्त विधानाचा जाहीर सभेतील एक व्हिडीओ बुधवारी आमदार देवेंद्र भुयार यांचा व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भुयार यांच्यावर टीका केली. दरम्यान, आता या टीकेला अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
आमदार देवेंद्र भुयार यांच्या वक्तव्यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, "देवेंद्र भुयार यांच्या विधानाचा विपर्यास करुन त्यावर राजकीय पोळी भाजण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत, त्यांनी ते वक्तव्य आधी ऐकावं. विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. शेतकऱ्यांच्या मुलांचीही अवस्था बिकट आहे. मराठवाडा आणि विदर्भात मुलांना ३५ शी ओलांडल्यानंतरही मुली भेटणे मुश्किल झाले आहे. शेतकऱ्यालाच वाटते आपली मुलगी शेतकऱ्याच्या घरी सून म्हणून जाऊ नये. हीच वस्तुस्थिती आमदार भुयार यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये मांडलण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा सोईच्या पद्धतीने घेतले गेले.
"देवेंद्र भुयार एवढे वादग्रस्त बोलले नाहीत. ते विधान फक्त आता रंगवले जात आहे. ते एक शेतकरी पुत्र आहेत. त्यांच्या विधानाचा विपर्यास करुन जाणीवपूर्वक अजितदादा आणि त्यांच्या पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न सूरू आहे, असा आरोपही आमदार अमोल मिटकरी यांनी केला.