केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता, प्रदेश भाजपा
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अलिकडेच दिलेल्या निर्णयाचे कायदेशीर मुद्यांनुसार यथासांग विच्छेदन, विश्लेषण आपआपल्या मगदुरानुसार होत आहे. या निकालातून जून 2022 मध्ये राज्यात घडलेल्या सत्तांतरावर कायदेशीर शिक्कामोर्तब झाले आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी या निकालाविरोधात फोडलेला टाहो, केलेला आक्रोश अपेक्षितच होता. या निकालाचे कायदेशीर दृष्टीतून विवेचन करण्याचा हेतू नाही. या निकालातून उद्धव ठाकरे यांच्या राजकीय कर्तव्यशून्यतेच्या चेहऱ्याची पुन्हा ओळख करून देण्यासाठी हा लेख प्रपंच आहे.
उद्धव ठाकरे यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या क्षणापासून विधानसभा अध्यक्षांच्या निकालापर्यंतच्या प्रवासाचा 'एमआरआय' काढल्यावर त्यांच्या राजकीय कर्तव्यशून्यतेचे ढिगभर दाखले मिळतील. उद्धव ठाकरे यांच्या या प्रवासाकडे पाहिल्यावर पेशवाईतील राघोबादादा आणि महाभारतातील दुर्योधन या व्यक्तीरेखांचे वारंवार स्मरण होते. अतीव सत्ताकांक्षा, कारस्थानांचा अंगभूत स्वभाव याचा मिलाफ असलेले उद्धव ठाकरे हे राघोबादादा आणि दुर्योधनाचे ‘फ्यूजन’ ठरतात. राघोबादादांनी पेशवाईची गादी मिळवण्यासाठी स्वकियांशी दगाबाजी करत थेट इंग्रजांशी हातमिळवणी केली. दुर्योधनाने आपल्या सख्ख्या चुलत भावंडांना कपटाने त्यांच्या हक्काच्या राज्यशकटापासून वंचित ठेवले. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा राजकारणातील वैभवशाली वारसा कार्यकर्तृत्वाच्या चढत्या भाजणीने पुढे नेण्याऐवजी त्याची अधोगतीकडे कशी वाटचाल होईल याकडेच उद्धव ठाकरेंनी लक्ष दिले.
बाळासाहेब ठाकरे यांनी आपले पिताश्री प्रबोधनकार ठाकरे यांच्या सांगण्यानुसार मराठी माणसांसाठी लढणारी संघटना बांधली. ही संघटना बांधत असताना बाळासाहेबांनी प्रचंड संघर्ष केला. या संघटनेला मराठी माणसांच्या हिताकरीता कार्यरत असणारी व्यवस्था बनवताना बाळासाहेबांनी स्थानीय लोकाधिकार समितीसारख्या संस्थेच्या रूपातून नियोजनबद्ध मेहनत घेतली.
प्रस्थापित व्यवस्थेशी दोन हात करताना साथीदारांच्या पाठीमागे संघटनेचे पाठबळ उभे केले. त्याच वेळी या संघटनेच्या माध्यमातून जोडला गेलेला सामान्य शिवसैनिक आपुलकी आणि ममत्वाच्या धाग्याने जपला. राजकारणात टिकण्यासाठी संघर्षाची तयारी , माणसं जोडणे , जपणे एवढे गुण पुरेसे नसतात, त्यासाठी अंगी राजकीय शहाणपणही लागतं. 1980 च्या दशकात हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेताना बाळासाहेबांनी आपली राजकीय जाण किती पक्की होती, हे दाखवून दिले. 1987 ची विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणूक, 1988 मधील छत्रपती संभाजीनगरची पहिली महापालिका निवडणूक यातून बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा गजर केला. पुढे भाजपाबरोबर युती झाल्यानंतर राज्यभर प्रवास करताना शिवसेनेची पाळेमुळे ग्रामीण भागात रूजवण्यासाठी अथक मेहनत घेतली.
1995 च्या विधानसभा निवडणुकीआधी बाळासाहेबांनी मोटारीमधून प्रवास करत शरद पवार आणि त्यावेळच्या काँग्रेसविरोधात रान पेटवले होते. बाळासाहेबांच्या या राजकीय प्रवासाशी उद्धव ठाकरेंची तुलना केल्यावर हाती भलेमोठे शून्य लागते. एखाद्या धनिकाचा पुत्र पित्याच्या लाखाचे बारा हजार करून टाकतो. उद्धव ठाकरेंनी नेमकं तेच 'करून दाखवलं'.
कोणत्याही पक्षाची संघटना बांधण्यासाठी जमिनीवर उतरून परिश्रम घ्यावे लागतात, हे उद्धव ठाकरेंच्या गावीही नसावे. 'असेल हरी, तर देईल खाटल्यावरी ' या वृत्तीने राजकारणात वावरलात तर घरी बसण्याची वेळ येते. बाळासाहेबांच्या करिश्म्याच्या आणि पुण्याईच्या बळावर आपल्याला राजकारणात कायम टिकता येणार नाही, हे प्राथमिक शहाणपणही त्यांच्याकडे नव्हते. बाळासाहेबांनी राजकारणात जे काही स्थान मिळवलं ते स्वकष्टार्जित होते. बाळासाहेबांचा हा वारसा पुढे न्यायचा असेल तर आपल्याला त्याहीपेक्षा अधिक कष्ट उपसावे लागतील, राजकारणातले पेच-डावपेच शिकावे लागतील, जनतेसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्षाची पावले टाकावी लागतील, याची जाणीव न ठेवता आपल्याच कैफात, कोषात वावरणार्या उद्धव ठाकरेंनी वेगळ्या अर्थाने 'स्वमग्नतेचे' दर्शन घडवले. सामान्य शिवसैनिकांसाठी आणि सामान्य माणसांसाठीही बाळासाहेबांनी मातोश्रीचे दरवाजे सताड उघडे ठेवले होते. उद्धव ठाकरेंनी कार्यकर्ते आणि जनतेसाठी मातोश्रीचे दरवाजे बंद करताना आपल्या मनाची कवाडेही बंद करून टाकली होती. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनाही या महाशयांना सहज भेटता येत नसे. बाळासाहेबांच्या काळातील कार्यकर्त्यांची पिढी कालपरत्वे अस्तंगत होत असताना तशीच फळी तयार करण्यासाठी आपल्याला हात-पाय हलवावे लागतील, हे ध्यानात न घेता उद्धव ठाकरे आयत्या पीठावर रेघोट्या मारत बसले. या कर्तृत्वशून्यतेची परिणती संघटनेची मजबूत रचना हळूहळू कमकुवत होण्यात झाली.
शिवसेनेचा ब्रँड पाठिशी असल्यामुळे जिल्हा-जिल्ह्यातील सामान्य कार्यकर्त्यांनी लढाऊपणे आपलेही समांतर अस्तित्व निर्माण केले. संघटना बांधणीसाठी राज्यभर कधीच न फिरलेल्या उद्धव ठाकरेंचे राजकारणात येण्यामागचे प्रयोजनच कळेनासे होते. 2014 मध्ये भाजपाबरोबरचा जागा वाटपाचा तिढा दोन-चार पावले मागे घेत सोडवण्याचा व्यवहारीपणाही त्यांनी दाखवला नाही. ''युतीत आम्हीच मोठे भाऊ, तुम्हाला एकही जागा जास्तीची देणार नाही,'' असे म्हणणार्या उद्धव ठाकरेंना राजकारणात टोकाच्या अहंकाराला जागा नसते, हे कधीच कळले नाही. 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांच्या ताकदीचा फुगा पुरता फुटला. मुंबईची सत्ता राखताना त्यांची दमछाक झाली. तरीही त्यांचा तोरा बदलला नाही .
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांची अनेक वर्षाची मुख्यमंत्रीपदाची लालसा उफाळून आली. दगाबाजीच्या कर्माने मुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर चांगला कारभार करून आपले राजकारणातील स्वतंत्र स्थान निर्माण करण्याची बुद्धीही त्यांना झाली नाही. स्वपक्षाच्या आमदारांनाही दुर्मिळ झालेले उद्धव ठाकरे 2019 ते 2022 या काळात राजकारणातील कालबाह्यतेकडे वाटचाल करू लागले होते. जून 2022 मध्ये सहकार्यांनी या बेपर्वाईविरोधात निशाण उभे केल्यावरही उद्धव ठाकरेंना जाग आली नाही. ही कर्तृत्वशून्यता आजच्या त्यांच्या अवस्थेस कारणीभूत ठरली आहे. आता भविष्यात मातोश्री बाहेर पडून संघटना बांधण्याची धमक त्यांच्यात नाही. ज्या सुभेदारांनी स्वत:च्या बळावर आपल्या सुभेदार्या राखल्या आहेत त्यांना उद्धव ठाकरेंच्या सहाय्याची गरज नाही.
बाळासाहेबांनी निर्माण केलेला झंझावात उद्धव ठाकरेंना पुन्हा निर्माण करता येईल, असे स्वप्न संजय राऊतही पाहत नसतील. त्यांच्या राजकीय कुंडलीकडे पाहिल्यावर हा गृहस्थ राजकारणात का आला व त्याला काय साध्य करायचे होते, या प्रश्नाचे उत्तर काही केल्या मिळत नाही. विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर त्यांना शिव्याशाप देत आदळआपट करून उद्धव ठाकरेंनी आपण गतकाळातून काहीच शिकलेलो नाहीत, हे जगजाहीर केले आहे. विचार, संपत्ती, कर्तृत्व, कला याचा वारसा टिकवणे हे येर्या-गबाळ्याचे काम नाही. उत्तुंग वारसा लाभलेल्या अनेकांना तो वारसा पुढे नेता आलेला नाही. बिजू पटनाईक यांचे चिरंजीव नवीन पटनाईक यांनी आपल्या पिताश्रींचा वारसा कार्यकर्तृत्वाने आणखी समृद्ध केला. जगमोहन रेड्डीसारख्या युवा नेत्याने काँग्रेसमधून बाहेर पडत, प्रवाहाच्या उलट्या दिशेने जात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. उद्धव ठाकरेंनी काय कमावले आणि काय गमावले, याचा हिशोब मांडायला बसल्यावर गोळाबेरीज कर्तृत्वाच्या शून्यापाशी येऊन संपते. दैव देते आणि कर्म नेते असं आपल्याकडे म्हणतात. यांच्याबाबतीत दुष्कर्माने मिळवलं आणि कर्मानेच घालवलं, असं म्हणण्यावाचून पर्याय नाही.