Amit Shah Supriya Sule: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दिवसाची सुरुवात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील जोरदार राड्याने झाली. विधानभवनात राज्याच्या जनतेसाठी कायदे केले जातात आणि विधेयके मांडून निर्णय घेतले जातात, त्याच विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तू-तू मैं-मैं झाल्याचं दिसलं. विधान भवनाच्या पायऱ्यांवर राडा झाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली. सुरुवातीला महेश शिंदे यांनी शिवीगाळ केल्याची तक्रार अमोल मिटकरी यांनी केली. पण शिंदे गटातील आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी सांगितल्यानुसार, मविरआच्या आमदारांनी सुरूवात केली आणि त्यास शिंदे गटाने प्रत्युत्तर दिले. या साऱ्या प्रकारानंतर गोगावले यांच्या भाषणाचा एक छोटा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केला आणि थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना साद घातली.
"गृहमंत्री अमित शाह जी, शिंदे गटातील आमदार महाराष्ट्र विधानभवन परिसरात खुलेआम महाविकास आघाडीच्या आमदारांबद्दल हिंसक विधान करून त्यांना चिथवण्याचे आणि धमकावण्याचे काम करत आहेत. आपल्या भाजपा पक्षासोबत युतीत सरकार चालवणाऱ्या या लोकांच्या अशा प्रकारच्या विधानांबद्दल आपण त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. तसेच मविआ च्या आमदारांच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता आणि त्यांच्याबाबत वाढणारा धोका लक्षात घेता त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी आमची विनंती आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे असे वर्तन सत्ताधारी आमदारांनी केले आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी तुम्ही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी (Devendra Fadnavis) यांच्याशी लवकरात लवकर या संदर्भात चर्चा करा आणि येथील परिस्थिती पाहता शिंदे गटातील आमदारांना कायदा आणि लोकशाहीच्या मूल्यांबाबत समज द्या", अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
आमदार भरत गोगावले काय म्हणाले?
विधान भवनाच्या पायऱ्यांवर झालेल्या राड्यानंतर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, जे काही घडलं ते केवळ ट्रेलर होता आणि पिक्चर अजून शिल्लक आहे. "आम्ही भाजपाच्या आमदारांसोबत घोषणाबाजी करत होतो. त्यावेळी महाविकास आघाडीचे आमदार आमच्या चाल करून आले. आम्ही दिलेल्या घोषणा त्यांना चांगल्याच झोंबल्या. त्यांनी तसे करायला नको होते. गेले दोन दिवस ते लोक घोषणा देत आहेत, त्यावेळी आम्ही त्यांना काहीही केले नाही. मग आज आम्ही घोषणाबाजी करताना मुद्दाम मध्ये येऊन आमच्यावर चालून येण्याची काय गरज होती? त्यांनी आम्हाला धक्काबुक्की केली असं ते म्हणत असतील तर त्यांच्यात तेवढी हिंमत नाही. उलट आम्हीच त्यांना बाजूला सारलं आणि धक्काबुक्की केली. हा तर केवळ ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे", असे गोगावले म्हणाले. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी अमित शाहांना उद्देशून ट्वीट करत मदत मागितली.