Maharashtra Politics: आज राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. अजित पवार आपल्या समर्थकांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाडांची विरोधी पक्षनेतेपदी आणि पक्षाच्या मुख्य प्रतोडपती निवड केली. यानंतर अव्हाडांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांसह बंड करणाऱ्या सर्व नेत्यांवर सडकून टीका केली.
आव्हाड म्हणाले, 'माझ्या भूमिकेवर शरद पवारांनी नेहमी प्रेम केले आहे. शोषितांच्या बाजूने उभे राहणाऱ्या चेहऱ्याला पवारांनी विरोधी पक्षनेता केलं आहे. कुणी आपल्याला अवघड स्थितीमध्ये आपल्याला टाकलंय, म्हणून त्या स्थितीकडे पाहायचं नाही. त्या स्थितीला एक संधी म्हणून पाहायचं. माझ्या दृष्टीने राष्ट्रवादीचे नेते फक्त शरद पवार आहेत. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय, पक्ष आणि निशानी कुणीच घेऊ शकणार नाही. 6 तारखेला बैठक होती, त्याच्या आधीच एवढी घाई. बैठकीत सांगितलं असतं की, आम्ही असं करणार आहेत, तर साहेब म्हणाले असते ठीक आहे, करा. बैठक ठेऊन अशी गोष्ट करणे, याला काय म्हणायचे. पवारांनी दोन नेत्यांची नावे घेतली, त्यांच्याविरोधात कारवाई होणार आहे,' असं आव्हाड म्हणाले.
ते पुढे म्हणतात, 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांकडे आहे आणि पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. जयंत पाटलांनी माझी प्रतोड आणि विरोधी पक्षनेतेपदी निवड केली आहे. प्रतोद म्हणून मी जो व्हिप काढेन, तो त्यांनाही लागू होईल. शरद पवारांमुळे यांनी 25-25 वर्षे मंत्रिपदे उपभोगली, अजून तुम्हाला काय हवंय? ज्या नेत्याने मेहनतीची पराकाष्ट केली, ज्यांनी तुम्हाला महसूलमंत्री, अर्थमंत्री केलं, ज्यांनी सगळी समृद्धी दिली, सगळे मानसन्मान मिळवून दिले, अशा माणसाला त्याच्या अखेरच्या वयात अशा परिस्थितीत टाकणे माणुसकिला शोभणारे नाही.'
'मला कुणी विचारणार नव्हतं आणि मला कुणी विचारणारही नाही. मी मेलो तरी शरद पवारांची साथ सोडणार नाही. काही जणांचे घरचे, नातेवाईक, गावातले लोक फोन करत आहेत. मतदारसंघात उद्रेक व्हायला सुरुवात झाली आहे. सगळं आरामात चालू आहे, असं नाही. लोकांना हे सहन होत नाहीये. शरद पवारांचे विरोधकही म्हणतात, ज्या माणसाने या लोकांना एकहाती मोकळं मैदान दिलं, त्या माणसाला तुम्ही काय दिलं. तुम्ही चार आमदार निवडून आणले का? त्यांनी आमदार निवडून आणायचे, त्यांनी पावसात भिजायचं, त्यांनी आजारपणात सगळी भाषणं करायची आणि तुम्हाला मंत्रालयात बसण्याची संधी द्यायची. एखाद्या पोराने म्हाताऱ्या बापाला बाहेर काढावं, आपण एवढं निष्ठूर, संवेदना विसरलेली माणसं झाले आहोत. जे एकनाथ शिंदे म्हणत होते, अजित पवारांनी निधी दिला नाही, तेच शिंदे अजित पवारांचे स्वागत करत आहेत. इतका विरोधाभास महाराष्ट्राने पाहिला नाही,' असंही आव्हाड म्हणाले.