लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळविल्यानंतर राज्यातील हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी वर्षा बंगल्यावर अर्धा तास चर्चा केली.
प्रत्येक राज्यात काँग्रेसला दुर्बल करण्याची भाजपची रणनीती कालच्या निकालावरून दिसते. काँग्रेसला मानणारा मतदार पद्धतशीरपणे अन्य लहान पक्षांकडे कसा वळेल, ही भाजपची खेळी दिसते. उद्या महाराष्ट्रातही तसेच झाले तर एकूणच महाविकास आघाडीला त्याचा फटका बसू शकतो, या मुद्यावर ठाकरे-पवार यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. कालच्या निकालानंतर विशेषत: शिवसेनेचे आमदार अधिक अस्वस्थ असल्याचे मानले जाते. त्यांना विश्वासात घेऊन महाविकास आघाडीने मजबुतीने सामोरे जाण्याची गरज बैठकीत व्यक्त झाली.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते आ. आशिष शेलार यांनी राजभवनवर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यातील सद्यस्थितीबाबत यावेळी चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. १२ आमदारांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीचा मुद्दा, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा विषय या चर्चेत होता, असे समजते.
चार मंत्रीही राज्यपालांना भेटलेछगन भुजबळ, एकनाथ शिंदे, हसन मुश्रीफ आणि विजय वडेट्टीवार या चार मंत्र्यांनी राज्यपाल कोश्यारी यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या विधेयकास मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. तसेच, विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी परवानगी मागितली. याविषयी आपण लवकरच राज्य सरकारला कळवू, असे राज्यपालांनी त्यांना सांगितले.
राष्ट्रपती राजवट, बिलकूल नाहीभाजपच्या विजयानंतर आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राज्यपालांशी भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना ही शक्यता फेटाळून लावली. १७० आमदारांचे भक्कम संख्याबळ आमच्याकडे असताना, राष्ट्रपती राजवटीचा प्रश्न येतोच कुठे, असा सवाल त्यांनी केला.