मुंबई : शिवसेनेतील दोन गट विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने आमनेसामने येण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हिप जारी केला आहे. तो शिंदे गटातील आमदारांसाठीही लागू असेल का, हा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. ठाकरे गटाचे सुनील प्रभू हे प्रतोद आहेत, तर शिंदे गटाचे प्रतोद हे भरत गोगावले आहेत. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांना मान्यता दिली आहे.
अधिवेशन काळात अनेक विधेयके मंजुरीसाठी येणार आहेत. धोरणात्मक बाबीही चर्चेसाठी येतील. अशा वेळी आम्ही जी भूमिका घेऊ ती शिवसेनेच्या सर्व आमदारांसाठी लागू असेल असा ठाकरे गटाचा दावा आहे. या भूमिकेला छेद देणारी भूमिका शिंदे गटाकडून नक्कीच घेतली जाईल. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लागावा यासाठीही ठाकरे गटाची ही खेळी असल्याचे मानले जात आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात २२ ऑगस्टला होणार आहे.
प्रभू यांचा व्हिप आम्हाला लागूच होऊ शकत नाही शिंदे गटातील एका ज्येष्ठ आमदाराने ‘लोकमत’ला सांगितले की, प्रभू यांनी काढलेला व्हिप आम्हाला लागूच होऊ शकत नाही. भरत गोगावले यांनी काढलेला व्हिप कायद्यानुसार आम्हाला लागू आहे. शिवसेनेचे विधानसभेतील पक्षनेते एकनाथ शिंदे आहेत. प्रतोद गोगावले आहेत आणि त्यांना विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली असल्याने प्रभू यांच्या व्हिपला अर्थ उरलेला नाही.