Maharashtra Politics : प्रगतिशील आणि आर्थिकदृष्ट्या विकसित राज्य असल्याने महाराष्ट्राची गणना ही देशातील प्रमुख राज्यांमध्ये होते. त्यामुळेच येथील सामाजिक आणि आर्थिक घडामोडींसह राजकारणावरही देशाचं कायम लक्ष असतं. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या राजकारणाला दिशा देण्याचं काम महाराष्ट्रानं अनेकवेळा केलंय. लोकसभा सदस्यसंख्येच्या दृष्टीने देशातील दुसरं सर्वात मोठं राज्य असल्याने लोकसभेच्या निवडणुका आल्या की सर्वांच्या नजरा ह्या उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रावर असतात. एवढंच नाही तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह औद्योगिकदृष्ट्या प्रगत अशी अनेक शहरं असल्याने महाराष्ट्रातील सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस आणि भाजपा या राष्ट्रीय पक्षांसह राज्यातील प्रादेशिक पक्षही उत्सूक असतात. अशा या महाराष्ट्राच्या राजकारणात मागची पाच वर्षं ही राजकीय दृष्ट्या उलथापालखीची ठरली होती. त्यात २०१९ हे वर्ष महाराष्ट्रासाठी महत्वाचं ठरलं होतं. या वर्षात महाराष्ट्राच्या राजकारण वेगळ्या वळणावर गेलं होतं. अनेक वर्षे एकमेकांविरोधात लढलेले पक्ष एकत्र आलेले पाहायला मिळाले. २०१९ च्या विधानसभेनंतर शिवसेनेचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार, काँग्रेस यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी स्थापन झाली,या आघाडीत समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष व काही अपक्ष आमदार सुद्धा होते.या आघाडीने राज्याचे राजकारणच बदलून टाकले. त्यानंतरच्या पाच वर्षांत काय काय घडलं. या महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा फायदा आणि तोटा कुणाला झाला. याचा आढावा पुढील प्रमाणे...
शिवसेनेत उभी फूट पडली
महाविकास आघाडीने राज्यात सत्ता स्थापनेचा दावा केला आणि २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. महाविकास आघाडीचे अडीच वर्ष सरकार चालले. यानंतर जून २०२२ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुका आल्या. या निवडणुकाच महाविकास आघाडी सरकार आणि महाराष्ट्राच्या राजकारणात टर्निंग पॉइंट ठरल्या.
विधान परिषदेच्या निवडणुकांचे निकाल समोर आले, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील ५० आमदारांनी बंड केले. शिवसेनेत उभी फूट पडली. यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर शिंदे भाजपासोबत गेले. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले.
पुढं शिवसेना खरी कोणाची यावरून निवडणूक आयोग आणि कार्टात सुनावणी झाली. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्याकडेच धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्ष गेला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह मिळालं.
राष्ट्रवादीत उभी फूट
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्याच्या एक वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ नेत्यांनी या सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. सुरुवातीला आधी वाटले या निर्णयाला शरद पवार यांचाही पाठिंबा आहे. पण नंतर काहीवेळाने शरद पवार यांनी राष्ट्रवादीतील आमदार फूटल्याचे जाहीर केले. अजित पवार यांच्यासोबत चाळीसहून अधिक आमदार गेले तर राष्ट्रवादी पक्ष कोणाचा हे प्रकरण निवडणूक आयोगात गेले. निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्याकडे पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांच्या पक्षाला नाव आणि चिन्ह नवीन दिले.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश
दोन्ही पक्षातील फुटीनंतर राज्यात पहिलीच मोठी निवडणूक ही लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून झाली. या निवडणुका महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा झाल्या, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासाठी राज्यात सहानभुतीची लाट असल्याचे बोलले जात होते. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं.
महाविकास आघाडीने लोकसभेच्या निवडणुका एकत्रित लढवल्या. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच प्रामुख्यानं लढत झालेल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३० अधिक एक अपक्ष अशा मिळून ३१ जागा, तर महायुतीला १७ जागा मिळाल्या.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ४३.९१ तर महायुतीला ४२.७३ टक्के मिळाली. ‘भाजप’ला १ कोटी ४९ लाख ६६ हजार ५७७ मते मिळाली. मात्र भाजपाला अवघ्या ९ जागाच मिळाल्या.
लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती मत मिळाली?
भाजपा- २६.१८ टक्के मते मिळाली
काँग्रेस - १६.९२ टक्के मते मिळाली
राष्ट्रवादी ( शरद पवार गट)- १०.२७ टक्के मते मिळाली
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- ३.६० टक्के मते मिळाली
शिवसेना (शिंदे गट) - १२.९५ टक्के मते पडली
शिवसेना (ठाकरे गट) - १६.७२ टक्के मते मिळाली विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश
लोकसभा निवडणुकीनंतर चार महिन्यानंतर लगेच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीची महायुती आणि महाविकास आघाडीने मोठी तयारी केली होती. पण महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही, महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले. महायुतीने लोकसभा निवडणुकीनंतर तीनच महिन्यात मोठं काम केलं, राज्यातील वातावरण बदलून टाकले. चार महिन्यात महायुतीने महाविकास आघाडीला मागे टाकले.
विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती मत मिळाली?
भाजपा- २६.७७ टक्के मते मिळाली
काँग्रेस - १२.४१ टक्के मते मिळाली
राष्ट्रवादी ( शरद पवार गट)- ११.२८ टक्के मते मिळाली
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- ०९.०१ टक्के मते मिळाली
शिवसेना (शिंदे गट) - १२.३८ टक्के मते पडली
शिवसेना (ठाकरे गट) - ०९.९६ टक्के मते मिळाली
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने कमी जागा लढवल्या होत्या. १० जागा लढवून त्यांनी ८ जागांवर विजय मिळवला होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाला मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला २० जागा, शरद पवार गटाला १० जागा तर काँग्रेसला १६ जागा मिळाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवणाऱ्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा धक्का बसला. आता या पराभवातून सावरून पुढे वाटचाल करण्याचं मोठं आव्हान महाविकास आघाडीसमोर असेल.