मुंबई :
वाऱ्याच्या वेगाने मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनने आता ब्रेक घेतला आहे. समुद्रात ‘सिस्टीम’ तयार होत नसल्याने पाऊस कोसळत नसल्याचे कारण हवामान खात्याने पुढे केले असले तरी येत्या ४८ तासांत तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून सक्रिय होईल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मान्सूनचा पाऊस कोसळण्यासाठी ला निनो सक्रिय लागतो. मात्र आता अल निनो सक्रिय आहे. शिवाय पाऊस कोसळण्यासाठी पोषक वातावरण तयार होण्यासाठी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार व्हावे लागते. सध्या मान्सूनला लो करंट आहे. मान्सून कोसळण्यासाठी एक सिस्टीम तयार व्हावी लागते. सद्यस्थितीमध्ये यापैकी काहीच होत नसल्याने मान्सूनने विश्रांती घेतली आहे.
पाऊस कुठे थांबला?मान्सून २९ मे रोजी केरळात दाखल झाला होता. त्यानंतर पुढील प्रवासात मान्सून तामिळनाडू, कर्नाटकच्या काही भागासह गोव्याच्या सीमेवर दाखल झाला होता. मात्र येथे मान्सूनला तब्बल दहा दिवसांचा ब्रेक लागला. हवामान अनुकूल झाल्यानंतर मान्सून मागील आठवड्यात शुक्रवारी वेंगुर्ल्यात दाखल झाला. त्यानंतर पुढील २४ तासांत म्हणजे शनिवारी मान्सून मुंबई, ठाणे, रायगडसह लगतच्या प्रदेशातदेखील सक्रिय झाला. मात्र रविवार, सोमवार आणि मंगळवारी पाऊस बेपत्ता झाला असून, मुंबईत तर कडाक्याचे ऊन पडले.
राज्यात कडकडाटासह वादळाची शक्यतापश्चिम किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून, मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी हवामान अनुकूल होत आहे. त्यानुसार, हवामानाने अनुकूलता दर्शविली, तर मान्सून पुढील प्रवासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला.
पश्चिम किनाऱ्यावर ऑफ-शोअर ट्रफ (कमी दाबाचे क्षेत्र) आणि पश्चिमेकडील वाऱ्याच्या प्रभावाखाली येत्या पाच दिवसांत राज्यात वादळाची शक्यता आहे.- कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामान शास्त्र विभाग